बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर अज्ञातांनी पहाटे गोळीबार केलाय. दुचाकीवर आलेल्या दोघांनी हा गोळीबार केल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आलंय. सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये. सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर हा गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबाराच्या घटनेनंतर सर्व यंत्रणात तपासाला लागल्या आहेत. आरोपींचा कसून शोध हा घेतला जातोय. ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरातच असल्याचे सांगितले जातंय.
सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आता नुकताच डीसीपी राज टिळक रोशन यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीये. राज टिळक रोशन म्हणाले की, घटना पहाटे पाच वाजता घडली, दुचाकीवर दोघेजण होते. गोळीबाराच्या 4 ते 5 राउंड झाल्या, त्या कोणाच्या होत्या हे समजू शकलेले नाहीये. आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
हवेत गोळीबार केल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. ते कोणत्या टोळीचे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुन्हा दाखल झाला आहे. 15 ते 20 पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत आलेल्या लिंकनुसार चौकशी सुरू आहे. घटनेच्या वेळी सलमान खान घरात उपस्थित होता. या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास केला जात असल्याचे स्पष्ट आहे.
गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळत आहेत. सलमान खान याला काही दिवसांपूर्वीच मेलवरूनच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सतत लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्येही लॉरेन्स बिश्नोई सलमानला जीवे मारणार असल्याचे म्हणताना दिसत होता.
सलमान खान याच्या घरावर आता गोळीबार झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई याचे नाव परत एकदा चर्चेत आले. पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमध्येही लॉरेन्स बिश्नोई याचा हात होता. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई याने स्पष्ट केले होते की, सिद्धू मुसेवालानंतर सलमान खान हा आपल्या निशाण्यावर आहे. मात्र, सलमान खान याच्या घरावर झालेला गोळीबार हा लॉरेन्स बिश्नोई यानेच केला का हे स्पष्ट होऊ शकले नाहीये. या प्रकरणात अजूनही काही मोठे खुलासे होऊ शकतात.