मुंबई- अभिनेत्री दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) सोमवारी रात्री मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अस्वस्थता जाणवल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. दीपिकाला सोमवारी रात्री रुग्णालयात दाखल करताच विविध चाचण्या करण्यात आल्या. या सर्व गोष्टींसाठी जवळपास 12 तासांचा अवधी लागला. काही चेकअप्स केल्यानंतर डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिला.
काही दिवसांपूर्वी दीपिकाला हैद्राबादमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शूटिंगदरम्यान हृदयाचे ठोके (Heart Rate) वाढल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अभिनेता प्रभाससोबतच्या चित्रपटासाठी ती शूटिंग करत होती. काही तासांच्या चेकअपनंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला होता.
एकामागोमाग एक सातत्याने कामाचा दबाव असल्याने त्याचा परिणाम दीपिकाच्या आरोग्यावर होत असल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी दिपिकाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात केल्यानंतर ती युरोप दौऱ्यावर गेली. युरोपहून परतल्यानंतर तिने प्रभाससोबत शूटिंगला सुरुवात केली. कामाच्या या व्यग्र वेळापत्रकामुळे तिच्या रक्तदाबावर परिणाम झाला, अशी माहिती निर्माती अश्विनी दत्त यांनी दिली होती.
दीपिकाचा ‘गेहराईयाँ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये तिच्यासोबत अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य कारवा यांच्या भूमिका होत्या. यानंतर ती प्रभाससोबत एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप ठरलेलं नाही. याशिवाय ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘द इंटर्न’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ मध्येही तिची भूमिका आहे.