मुंबई : मुघलांची राक्षसी प्रतिमा दाखवणारे चित्रपट पाहणं ‘समस्यात्मक (प्रॉब्लेमॅटिक) आणि त्रासदायक’ वाटतं. कारण ते ‘केवळ लोकप्रिय विचारधारेसह जाण्यासाठी’ बनवले गेले आहेत. ते ‘ऐतिहासिक पुराव्यांवर’ आधारित नाहीत, असं मत प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan) यांनी व्यक्त केलं आहे.
‘सुलतान’, ‘बजरंगी भाईजान’, ‘एक था टायगर’ ‘न्यूयॉर्क’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक कबीर खान, नुकत्याच एका मुलाखतीत म्हणाले की, मुघलांना राक्षसी रुपात दाखवणाऱ्या चित्रपटांचा आपण आदर करु शकत नाही. मुघलांचे वर्णन कबीर खान यांनी ‘मूळ राष्ट्रनिर्माते’ (original nation-builders) असे केले आहे.
कबीर खान नेमकं काय म्हणाले?
“मुघलांची राक्षसी प्रतिमा दाखवणं मला खूपच प्रॉब्लेमॅटिक आणि क्लेशदायी वाटतं. मला खरोखर कुठली गोष्ट अस्वस्थ करत असेल, तर ती म्हणजे केवळ लोकप्रिय कथानकानुसार जाण्यासाठी तशा प्रकारची सिने निर्मिती केली जाणं. जेव्हा एखाद्या चित्रपट निर्मात्याने कुठल्या गोष्टीवर संशोधन केले असते आणि चित्रपट निर्मात्याला एखादा मुद्दा मांडायचा असतो, तेव्हा मी समजू शकतो. नक्कीच, वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. पण जर तुम्हाला मुघलांना राक्षसी स्वरुपात दाखवायचे असेल, तर कृपया ते संशोधनावर आधारित दाखवा आणि तुम्हाला ते खलनायक का वाटले, हे आम्हाला समजावून सांगा” असं आवाहन कबीर खान यांनी निर्माते-दिग्दर्शकांना केलं.
“जेव्हा तुम्ही थोडंफार संशोधन केलं असतं आणि इतिहास वाचला असतो, तेव्हा मुघलांना खलनायक का ठरवलं गेलं, हे समजणं खूप कठीण जातं. मला तर वाटतं की ते मूळ राष्ट्रनिर्माते होते, पण त्या मुद्द्याला बगल देण्यासाठी त्यांनी लोकांचे खून केले, असं म्हटलं गेलं. पण तुम्ही कशाचा आधार घेत आहात? कृपया ऐतिहासिक पुरावे द्या. कृपया खुली चर्चा करा, फक्त तुम्हाला लोकप्रिय वाटेल अशा कथेसोबत जाऊ नका” असंही कबीर खान म्हणाले.
“मी त्या चित्रपटांचा आदर करु शकत नाही”
“भारताच्या इतिहासात वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या मुघल आणि इतर विविध मुस्लिम शासकांचे राक्षसीकरण करणे ही आज सर्वात सोपी गोष्ट आहे. त्यांना पूर्वग्रहदूषित रुढींमध्ये बसवण्याचा प्रयत्न करणे दुःखदायक आहे. दुर्दैवाने मी त्या चित्रपटांचा आदर करु शकत नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे, नक्कीच, मी प्रेक्षकांबद्दल बोलू शकत नाही, परंतु अशा प्रकारच्या चित्रणांमुळे मी नक्कीच अस्वस्थ होतो.” असंही कबीर खान यांनी स्पष्ट केलं.
ऐतिहासिक चित्रपटांवरुन वाद
ऐतिहासिक चित्रपटांवरुन झालेले वाद बॉलिवूडसाठी नवीन नाहीत. नजीकच्या वर्षांत, पद्मावत, पानिपत आणि तान्हाजी यासारख्या चित्रपटांतील ऐतिहासिक तथ्य संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. अभिनेता सैफ अली खान, ज्याने तान्हाजीमध्ये उदयभान राठोडची भूमिका केली होती, त्यानेही सिनेमात ऐतिहासिक तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडली गेल्याचा दावा केला होता.
या आठवड्यात ‘द एम्पायर’ ही सीरीज ओटीटीवर रिलीज होणार आहे. मुघल सम्राट बाबरची कथा यामध्ये मांडली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कबीर खान यांचं मत महत्त्वाचं मानलं जात आहे.
कबीर खानचा पुढचा चित्रपट 83 हा 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघावर आधारित आहे, जो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षापासून प्रदर्शनासाठी लांबला आहे.
संबंधित बातम्या :
बॉलिवूडमधील पाच हिंदी चित्रपट, ज्यांचे अफगाणिस्तानशी कनेक्शन, पाहा कोणते आहेत ‘हे’ चित्रपट…
‘तान्हाजी’ चित्रपटात दाखवलेल्या इतिहासाशी सहमत नाही : सैफ अली खान