गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे (Bollywood) अनेक सिनेमे फ्लॉप होत आहेत. तज्ज्ञांच्या मते याचं एक कारण असं आहे की दोन वर्षांहून अधिक काळ हिंदी चित्रपट (Hindi Movies) पाहणारे प्रेक्षक आता इतर भाषांचे बरेच डब (Dubbed) केलेले चित्रपट आणि परदेशी कंटेंट पाहत आहेत. आता बर्याच प्रमाणात चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये भाषेचा फरक नाही. मात्र इतर भाषांमधील चित्रपट, सीरिज सर्वांनीच बघायला सुरुवात केली आहे, असंही नाही. अजूनही बरेच लोक आहेत ज्यांना डब केलेले चित्रपट आवडत नाहीत आणि त्यांना सबटायटल्स वाचणंदेखील कठीण जातं. आता चित्रपट निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तरनेही या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
फरहान अख्तरने ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “आता लोक OTT प्लॅटफॉर्मवर विदेशी कंटेंट पाहत आहेत. प्रत्येकाला त्यांच्या भाषेशी भावनिक जोड असते. तुमच्या भाषेतील भावना तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता. कधीकधी एकच शब्द खूप भावना व्यक्त करतो, त्यामुळे तुमच्या भाषेतील आशयाचा वेगळा अर्थ असतो. पण तुम्ही बाहेरच्या लोकांशी बोलता तेव्हा त्या भावना थोड्या वेगळ्या असू शकतात. जेव्हा आपण ‘अलेक्झांडर द ग्रेट’ हा चित्रपट इंग्रजीत पाहतो तेव्हा आपली हरकत नसते, तर रोमन लोक कधीच इंग्रजी बोलत नसतात ही वेगळी गोष्ट आहे.”
याबद्दल पुढे बोलताना फरहान म्हणाला, “तुम्ही इंग्रजी चित्रपट किंवा सीरिज पाहणं हे अगदी सामान्य आहे. पण मला वाटतं आपण आता हा अडथळा तोडायला हवा. तुम्हाला हे करण्यासाठी काही चांगल्या मार्गाचा विचार करावा लागेल जेणेकरून त्याच भावना कोणत्याही भाषेत व्यक्त करता येतील. त्यामुळे व्यक्तिशः मला हा फार मोठा मुद्दा वाटत नाही. मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे की जग आता इतर भाषांमध्ये कंटेंट पाहत आहे आणि ते सर्वांसाठी फायदेशीर आहे.”
मात्र यासाठी बॉलिवूडला खूप प्रयत्न करावे लागतील आणि जागतिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांना कंटेंट बनवावा लागेल, असं मत फरहान अख्तरने व्यक्त केलं. याचं उदाहरण देताना तो म्हणाला, “अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘द अॅव्हेंजर्स’ने जी पद्धत स्वीकारली तीच पद्धत आपल्याला अवलंबावी लागेल. कोण कोणती भाषा बोलत आहे हे महत्त्वाचं नाही. दर्शकाला इंग्रजी येत आहे की नाही हे महत्त्वाचं नाही. या चित्रपटांमध्ये असं काहीतरी होतं जे तुम्ही फक्त पाहू शकता. कंटेंट निर्माते म्हणून आपल्यासाठी अशी उत्कृष्ट कंटेंट तयार करणं महत्त्वाचं आहे. भाषेचा प्रश्न खूप नंतर येतो.”