अभिनेता संजय दत्तच्या (Sanjay Dutt) कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात आलेले चढउतार हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेचे विषय राहिले आहेत. रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या ‘संजू’ (Sanju) या चित्रपटात त्याच्या आयुष्यातील बऱ्याच घडामोडी दाखवण्यात आल्या आहेत. संजूबाबा आणि त्याचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध हा नेहमीच इंडस्ट्रीतील वादग्रस्त विषय राहिला आहे. दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीसोबत त्याचे संबंध आढळून आल्यानंतर त्याला बरेच दिवस तुरुंगात घालवावे लागले होते. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा वाद म्हणजे बेकायदेशीर शस्त्रास्त्रं बाळगण्याचं प्रकरण. 1993 च्या बॉम्बे बॉम्बस्फोटात त्याचा सहभाग असल्याचाही आरोप त्याच्यावर होता. त्याच्याकडून 9 एमएम पिस्तूल, एके-56 रायफल, हँडग्रेनेड आणि दारूगोळा ताब्यात घेतल्यानंतर त्याला तुरुंगात डांबण्यात आलं होतं. नंतर त्याची या आरोपातून मुक्तता झाली. आता राकेश मारिया (Rakesh Maria) यांनी त्यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’ या आत्मचरित्रात संजयला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्याबाबत खुलासा केला आहे.
राकेश मारिया यांच्या पुस्तकात असं लिहिण्यात आलं की, “गेल्या काही दिवसांपासून मी तणावात होतो. मी त्याचं खोटं बोलणं सहन करू शकलो नाही आणि त्यामुळेच त्याला कानशिलात लगावली. खुर्चीवरून तो मागे पडणार तितक्यात मी त्याच्या मानेला घट्ट पकडलं. तो घाबरला होता. त्याच्या भयभीत झालेल्या डोळ्यांकडे बघत मी म्हणालो, “मी तुला एका सज्जन माणसाप्रमाणे विचारतोय, तू सुद्धा त्याचप्रमाणे उत्तर दे.” सुनील सत्त, राजेंद्र कुमार, महेश भट्ट, यश जोहर हे सर्व त्याला तुरुंगात भेटायला यायचे असंही मारिया यांनी आत्मचरित्रात लिहिलंय.
मारिया यांच्या आत्मचरित्रात उल्लेख केल्यानुसार, संजय दत्तने वडिलांसमोर आपली चूक कबुल केली आणि शस्त्र नष्ट केल्याचाही खुलासा केला. “आपल्या मुलाने अपराधाची कबुली दिल्यानंतर सुनील दत्त यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्यांना सर्वांत मोठा धक्का बसला होता. त्या घटनेने ते खूपच खचले होते. दुसरीकडे अटकेनंतर संजय दत्तसुद्धा भावनिकरित्या खचला होता. तो अनेकदा भेटीसाठी विनंती करायचा. त्याने स्वत:ला कोणतीही दुखापत करून घेऊ नये या भीतीने पोलीस कर्मचारी रात्री कामानंतर त्याला भेटायचे. यावेळी संजय दत्त त्याचं व्यसन, आई नरगिस दत्त, त्याचे अफेअर्स यांविषयी त्यांच्याकडे मोकळा व्हायचा आणि खूप रडायचा”, असंही त्यात म्हटलंय.