‘गंगुबाई काठियावाडी’ची (Gangubai Kathiawadi) भूमिका स्वीकारून अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) तिच्या करिअरमधील सर्वांत मोठा धोका पत्करला होता. आता चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहता आलियाच्या करिअरमधील हा सर्वांत महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा (Sanjay Leela Bhansali) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. मुंबईत 50 टक्के आसनक्षमता असतानाही चित्रपटाने सोमवारी चांगला गल्ला जमवला, असं मत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने व्यक्त केलं. या चित्रपटाने चार दिवसांत तब्बल 47.31 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन्सवरही चांगली कमाई होताना दिसत आहे. हुसेन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातील कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.
गंगुबाई काठियावाडीची आतापर्यंतची कमाई
पहिला वीकेंड- 39.12 कोटी रुपये
सोमवार- 8.19 कोटी रुपये
चार दिवसांत- 47.31 कोटी रुपये
कोण होत्या गंगुबाई काठियावाडी?
हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना गंगूबाई हे पात्र सापडलं. गंगुबाई या मूळच्या गुजरातच्या होत्या. वयाच्या सोळाव्या वर्षी प्रेमविवाह करून त्या मुंबईत पळून आल्या होत्या. मात्र लग्नानंतर त्यांच्या पतीने फक्त ५०० रुपयांसाठी त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं होतं. कामाठीपुरा परिसरात वेश्या व्यवसाय करताना गंगुबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात करीम लाला यांच्याशी गंगुबाईंची गाठ पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधत भाऊ मानलं. या घटनेनंतर करीम लालाने अवघा कामाठीपुरा गंगुबाईंच्या हातात दिल्याचं म्हटलं जातं. गंगुबाईंनी कधीही कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरोधात वेश्या व्यवसाय करू दिला नव्हता, असंही सांगितलं जातं.