महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत सासरे विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्यासाठी अभिनेत्री जिनिलिया देशमुखने (Genelia Deshmukh) खास पोस्ट लिहिली आहे. यासोबतच तिने रियान आणि राहील या आपल्या दोन मुलांचा फोटो पोस्ट केला आहे. एका फोटोमध्ये रियान आणि राहीलने (Riaan and Rahyl) त्यांच्या आजोबांचा फोटो दोन्ही बाजूंनी धरला असून दुसऱ्या फोटोमध्ये ते त्यांना वंदन करताना दिसत आहेत. जर आम्ही आजोबांना प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का, असा निरागस प्रश्न मुलांनी विचारला असता जिनिलियाने त्यांना काय उत्तर दिलं, हे तिने या पोस्टमध्ये सांगितलंय. त्यासोबत आम्हाला तुमची खूप आठवण येते, अशा शब्दांत भावनाही व्यक्त केल्या आहेत.
‘प्रिय पप्पा,
रियान आणि राहील यांनी मला आज विचारलं, “आई, जर आम्ही आजोबांना प्रश्न विचारला तर ते उत्तर देतील का?” त्यावर नि:संशयपणे माझं उत्तर होतं, “तुम्ही त्यांना ऐकू शकाल तर ते नक्की उत्तर देतील”. मी प्रामाणिकपणे इतकी वर्षे तुमच्याशी बोलत आणि तुमच्याकडून प्रत्येक उत्तर ऐकत जगले आहे. मला माहितीये की तुम्ही आमच्या कठीण काळातही सोबत राहिलात आणि चांगल्या काळातही आमच्यासोबत हसलात. मला माहित आहे की आमच्या प्रत्येक शंकांचं उत्तर तुम्ही देता आणि मला हेसुद्धा माहित आहे की आता मी जे लिहित आहे ते तुम्ही वाचत आहात. मला माहितीये की तुम्ही सदैव आमच्यासोबत राहाल, आम्ही तुम्हाला ऐकू शकू, तुम्हाला पाहू शकू आणि मोकळ्या मनाने तुम्हाला अनुभवू शकू आणि हे तुम्हीच आम्हाला दिलेलं वचन आहे. आम्हाला तुमची आठवण येते पप्पा. ता. क. – रियान आणि राहिल यांनी तुमचा फोटो दोन्ही बाजूंनी पकडण्याचा आग्रह केला,’ अशी पोस्ट जिनिलियाने लिहिली आहे.
जिनिलिया आणि रितेश नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. विविध फोटो आणि व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. याआधीही जिनिलिया आणि रितेश यांनी विलासराव देशमुखांसाठी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिले आहेत.