आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळू शकलं नाही. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला. त्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला आहे. एकीकडे चित्रपट समीक्षक ‘लाल सिंग चड्ढा’चं कौतुक करत असतानाच प्रेक्षकांनी मात्र त्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या 7 दिवसात ‘लाल सिंग चड्ढा’ने 49.25 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट फ्लॉप होण्यामागे बॉयकॉटचा ट्रेंड हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे. मात्र गिप्पी ग्रेवालने (Gippy Grewal) या चित्रपटाशी संबंधित आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे, ज्यामुळे चित्रपटाला फटका बसला आहे, असं त्याचं मत आहे.
पंजाबी गायक आणि अभिनेता गिप्पी ग्रेवालने त्याच्या ‘यार मेरा तितलियाँ वरगा’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान लाल सिंग चड्ढाच्या अपयशाबद्दल भाष्य केलं. यासोबतच त्याने चित्रपटात आमिरने बोललेली पंजाबी भाषा आणि त्याचा लहेजा याबद्दलही सांगितलं. गिप्पी ग्रेवाल म्हणाला, “मी सहमत आहे की आमिर खानच्या पंजाबी बोलण्यावरून बरीच टीका झाली आहे. त्याचे उच्चार अनेकांना आवडले नाहीत. पण जेव्हा आम्ही चित्रपटाच्या संवादांवर काम करत होतो तेव्हा आम्ही योग्य शैली आणि लहेजा ठेवला होता.
गिप्पी ग्रेवालने दावा केला की त्याने आणि त्याच्या टीमने ‘लाल सिंग चड्ढा’चे संवाद लिहिण्यास मदत केली. त्याने अभिनेता-लेखक राणा रणबीरसोबत ‘लाल सिंग चड्ढा’चे पंजाबी संवाद लिहिले. “पण जेव्हा मी चित्रपटाचे काही सीन्स पाहिले तेव्हा सल्ला दिला होता की पंजाबी भाषेचा उच्चार योग्य नाही आणि ते भाग पुन्हा डब करावेत. त्यांनी मान्य केलं, पण ते बदलले गेले नाही. कदाचित त्यांना ते योग्य वाटलं असेल,” असं तो म्हणाला.
गिप्पी ग्रेवालला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट आवडला आणि त्यातील आमिरचा शीख लूकसुद्धा आवडला. तो म्हणाला, “मला चित्रपट खूप आवडला. आमिरने ते पात्र चोख साकारलंय आणि त्याचा शीख लूक एकदम परफेक्ट होता. आमिरचा लूक पंजाब आणि परदेशात खूप आवडला होता. मात्र, कोणत्याही चित्रपटासाठी चांगला आशय असणं खूप गरजेचं आहे. तसं झालं नसेल तर ते सत्य चित्रपट निर्मात्यांनी स्वीकारावं.”
‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर रिलीज झाला तेव्हा त्यात आमिर खानच्या पंजाबी बोलण्याच्या स्टाईलला खूप ट्रोल करण्यात आलं. पंजाबी अभिनेत्री सरगुन मेहता हिनेसुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली होती. आमिर त्यावर आणखी थोडं चांगलं काम करू शकला असता, असं ती म्हणाली. त्यानंतर आमिरने एका मुलाखतीत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “लोकांनी चित्रपट पाहिल्यानंतर अशा गोष्टींवर मत व्यक्त करावं, 2 मिनिटांचा ट्रेलर पाहून नाही.”
काही दिवसांपूर्वी गिप्पी ग्रेवालने असाही खुलासा केला होता की, ‘लाल सिंग चड्ढा’ मधील लहानपणीच्या आमिरची भूमिका पहिल्यांदा त्याच्या मुलाला ऑफर करण्यात आली होती. त्याचा मुलगा शिंदा याला चित्रपटासाठी हेअरकट करण्यास निर्मात्यांनी सांगितलं होतं. मात्र हेअरकट करण्यास नकार असल्याने त्यांनी भूमिकेलाही नकार दिला.