मुंबई : दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) याने आज (28 जून) सकाळी आपला महाविद्यालयीन अभ्यास सोडून देण्याची घोषणा करून सर्वांना चकित केले. आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून, बाबिलने अशी माहिती दिली आहे की, आता तो अभिनेता म्हणून करिअर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी महाविद्यालय सोडत आहे (Goodbye College Irrfan Khan son Babil Khan quit his college studies).
बाबिल युकेच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून चित्रपट अभ्यासात ‘बॅचलर ऑफ आर्ट्स’ ही पदवी घेत होता. दिग्दर्शिका अनविता दत्तच्या नेटफ्लिक्सवर येणाऱ्या आगामी चित्रपटाद्वारे तो अभिनेता म्हणून पदार्पण करणार आहे. त्याने इंस्टाग्रामवर आपल्या मित्रांसाठी आणि विद्यापीठासाठी एक भावनिक संदेश लिहून शिक्षण सोडत असल्याची माहिती दिली.
त्याने लिहिले की, “माझ्या प्रिय मित्रांनो मला तुमची खूप आठवण येईल. माझे मुंबईत फक्त एक-दोन मित्र आहेत. आपण सर्वांनी मला दुसर्या देशात राहण्यास उद्युक्त केले… धन्यवाद. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करतो. आज मी ‘फिल्म बीए’ सोडतो आहे, कारण आता मला माझं पूर्ण लक्ष अभिनयावर केंद्रित करायचं आहे. गुडबाय वेस्टमिन्स्टर विद्यापीठ.”
चित्रपट निर्माते शुजित सिरकर आणि निर्माता रॉनी लाहिरी यांनीही गेल्या आठवड्यात बाबिलबरोबरच्या चित्रपटाची घोषणा केली होती. ज्याचा तपशील अद्याप देण्यात आलेला नाही.
29 एप्रिल 2020 रोजी अभिनेते इरफान खान यांचे मुंबईतील कोकिळबेन रुग्णालयात निधन झाले. त्यांची कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. ‘हिंदी मीडियम’ या चित्रपटासाठी ज्यावर्षी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला, त्याच वर्षी इरफानला ब्रेन कॅन्सर झाल्याची बातमी समोर आली.
या आजाराच्या उपचारासाठी ते सुमारे दीड वर्ष लंडनमध्ये राहिले. उपचारादरम्यान त्यांची तब्येत सुधारली होती. ज्यानंतर ते लवकरच चित्रपटांमध्ये पुनरागमन करतील, असे वाटत होते. आजारपणात त्यांनी ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाचे चित्रीकरणही केले, पण यावेळी ते तितकासे फिट दिसत नव्हते. राजस्थानमधील टोंक या छोट्या गावातून बाहेर पडत इरफान खानने बॉलिवूडमध्ये अभिनयात अव्वल स्थान गाठले. यासाठी त्यांनी वीस वर्षांपेक्षा जास्त काळ परिश्रम घेतले. मात्र, जेव्हा या मेहनतीचा निकाल मिळू लागला, तेव्हा इरफानने जगाचा निरोप घेतला.
(Goodbye College Irrfan Khan son Babil Khan quit his college studies)