मुंबई : बाॅलिवूडचा प्रसिध्द अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करतोय. मात्र, शूटिंग संपल्यानंतर बाजारपेठेत फिरत असताना काही युवकांनी इमरान हाश्मीवर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडलीये. या घटनेनंतर काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. इमरान हाश्मी जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाची शूटिंग करतोय. गेल्या काही दिवसांपासून इमरान जम्मू-काश्मीरमध्येच आहे. ग्राउंड झिरो (Ground Zero) चित्रपटात इमरान हाश्मी एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहेत.
इमरान हाश्मी चित्रपटाचे शूटिंग पुर्ण करून पहलगामच्या बाजारपेठेत फिरत असताना अचानक काही युवकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यावेळी इमरान हाश्मीसोबत चित्रपटाचे निर्माते आणि इतरही कलाकार होते. आता यासर्व प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध कलम 147, 148, 370, 336, 323 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. माहिती अशीही मिळत आहे की, पोलिसांनी दगडफेक प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यातही घेतले असून चाैकशी सुरू आहे.
इमरान हाश्मीचा ग्राउंड झिरो हा चित्रपट सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानावर आधारित आहे. याआधी चित्रपटाचे शूटिंग श्रीनगरमध्ये झाले होते. विशेष म्हणजे यापूर्वी इमरान हाश्मी 14 दिवस श्रीनगरमध्ये होता. पुढील काही दिवस ग्राउंड झिरो चित्रपटाचे शूटिंग कश्मीर येथे सुरू राहणार आहे. काही बातम्या अशा आल्या होत्या की, चित्रपटाच्या सेटवर दगडफेक करण्यात आलीये. मात्र, बाजारपेठेत फिरायला गेल्यावर ही दगडफेक करण्यात आलीये.