मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) 10 सप्टेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा करतो. अनुराग हा बॉलिवूडचा असा दिग्दर्शक आहे, जो नेहमी चौकटी बाहेरचे चित्रपट बनवतो. यामुळेच तो तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आपल्या चित्रपटांपेक्षा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेला अनुराग देश आणि जगात घडणाऱ्या जवळपास सर्व घटनांवर आपले मत व्यक्त करतो. यामुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते. पण, अनुरागही त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतो.
10 सप्टेंबर 1974 रोजी गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे जन्मलेल्या अनुराग कश्यपने डेहराडूनच्या ग्रीन स्कूल आणि ग्वाल्हेरच्या सिंधिया स्कूलमध्ये शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून प्राणीशास्त्रात पदवी घेतली. या दरम्यान, दिल्लीतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवलेल्या व्हिटोरियो डी सिकाच्या ‘बायसिकल थीफ’ चित्रपटाने अनुराग खूप प्रभावित झाला.
पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुराग मुंबईला पोहोचला. त्यावेळी त्याच्या खिशात केवळ पाच हजार रुपये होते. सुरुवातीला त्याला खूप अडचणींना सामोरे जावे लागले. एवढेच नाही तर हळूहळू पैसे संपल्यानंतर त्याला रस्त्यावर झोपावे लागले. या दरम्यान, त्याला पृथ्वी थिएटरमध्ये काम मिळाले. 1998 मध्ये मनोज बाजपेयीने लेखक म्हणून राम गोपाल वर्मा यांना अनुराग कश्यप याचे नाव सुचवले. राम गोपाल वर्मा यांनी अनुरागचे काही काम पाहिले होते आणि त्यांना ते आवडले देखील होते. अशा प्रकारे अनुराग कश्यपला ‘सत्या’ चित्रपटासाठी सौरभ शुक्लासह कथा लिहिण्याची संधी मिळाली.
अनुरागने दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात 2003 मध्ये ‘पंच’ या पहिल्या चित्रपटाद्वारे केली. मात्र, हा चित्रपट आजपर्यंत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला नाही. काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्याचा हा चित्रपट नक्कीच दाखवला गेला. त्यानंतर 2007 मध्ये अनुरागचा ‘ब्लॅक फ्रायडे’ चित्रपट आला. चित्रपटासंदर्भात बरेच वाद निर्माण झाले. त्यानंतर त्याने ‘देव डी’, ‘गुलाल’, ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘अग्ली’, ‘रमण राघव 2.0’ आणि ‘मनमर्जिया’ यासह इतर चित्रपट बनवले.
अनुराग त्याच्या चित्रपटांमध्ये मुख्यतः सामाजिक मुद्दे मांडत असतो. ज्यात ड्रग्स, धूम्रपान व्यसन, मुलांवर अत्याचार, नैराश्य आणि तणाव यासारख्या समस्या असतात. पण फार कमी लोकांना हे माहित असेल की त्यांच्या अशा विषयांची निवड अनुरागने स्वतः भोगलेल्या समस्यांमधून आली आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्याने या घटनेचा खुलासा केला होता.
त्याच्या लव्ह लाईफबद्दल बोलताना, अनुरागने 2003 साली चित्रपट संपादक आरती बजाजशी लग्न केले. मात्र, लग्नाच्या सहा वर्षानंतर म्हणजेच 2009 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. या जोडप्याला आलिया कश्यप नावाची मुलगी देखील आहे. यानंतर त्याची भेट अभिनेत्री कल्की कोचलिनशी झाली. कालांतराने त्यांचे नाते लग्नात बदलले. पण, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघांनी 2015 मध्ये घटस्फोट घेतला. सध्या अनुराग आपल्यापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या शुभ्रा शेट्टीला डेट करत आहे. शुभ्रा आणि अनुराग गेल्या काही काळापासून लिव्ह-इनमध्ये राहत आहेत.
Aai Kuthe Kay Karte | अनिरुद्ध पुन्हा अरुंधतीकडे जाणार, संजना देशमुखांच्या घरात एकटी पडणार?