मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोलला (Kajol) तिच्या अभिनयामुळे चाहते अधिक ओळखतात. काजोल नेहमी हसतमुख दिसते. आपल्या अभिनयाने अभिनेत्रीने सर्वांनाच भुरळ घातली आहे. आज म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी काजोल तिचा वाढदिवस साजरा करत आहे. काजोलने तिच्या कारकिर्दीत अनेक प्रकारचे चित्रपट चाहत्यांसमोर सादर केले आहेत.
दमदार अभिनयामुळे काजोलला 2011मध्ये भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही सन्मानित केले होते. काजोल अशी एक अभिनेत्री आहे, जिने आतापर्यंत प्रमुख भूमिकेत 6 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी मुंबईत झाला. काजोलची आई तनुजा एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या, त्यामुळे अभिनय तिच्यामध्ये जन्मापासूनच स्थिरावला होता. काजोलचे शालेय शिक्षण पाचगणीतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत झाले. काजोलला सुरुवातीपासूनच नृत्याची खूप आवड होती. असेही म्हटले जाते की, केवळ अभ्यास टाळण्यासाठी तिने हिंदी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याच्या दिशेने वाटचाल केली होती.
साधारण दिसणाऱ्या काजोलने हिंदी चित्रपटांचा प्रवास ‘बेखुदी’ या चित्रपटाने सुरू केला. काजोलने जेव्हा सिनेसृष्टीत पदार्पण केले, तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. मात्र, काजोलला या चित्रपटातून विशेष यश मिळाले नाही. या चित्रपटानंतर काजोलला ‘बाजीगर’ चित्रपटात अभिनयाची संधी मिळाली, ज्यात ती शाहरुख खानसोबत झळकली होती. या चित्रपटाने काजोलला रातोरात स्टार बनवले.
लाखो चाहत्यांचा हृदयावर राज्य करणाऱ्या काजोलचे हृदय सुपरस्टार अजय देवगणवर आले. अजयसोबत काजोलची पहिली भेट ‘गुंडाराज’ चित्रपटाच्या सेटवर झाली. दोघेही चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातून दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले. नंतर दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काजोलने 24 फेब्रुवारी 1999 रोजी अजयशी लग्न केले, त्यांना मुलगी न्यासा आणि मुलगा युग आहे. काजोलकडे ‘ओम’ लिहिलेली हिऱ्याची अंगठी आहे, जी ती नेहमी परिधान करते. पती अजयने काजोलला ‘इश्क’ चित्रपटाच्या सेटवर एंगेजमेंट रिंग म्हणून ही अंगठी घातली होती.
काजोलची शाहरुखसोबत अशी काही जोडी बनली आहे, की जी प्रत्येकाला आवडते. चाहत्यांना हे दोन स्टार एकत्र बघायला आवडतात. या जोडीने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. ‘बाजीगर’पासून ते ‘करण अर्जुन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे.
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ मधून आदिनाथ कोठारेची सरप्राईज एन्ट्री, प्रेक्षकांकडूनहे होतंय कौतुक!