मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आज (22 ऑक्टोबर) आपला 33वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी हरियाणाच्या अंबाला येथे झाला. सध्याच्या काळात चित्रपट जगतात एक सुप्रसिद्ध नाव बनलेल्या परिणीतीने लहानपणापासूनच चित्रपट जगतात जाण्याचा विचार केला नव्हता. कारण खरं तर ती एक अतिशय हुशार विद्यार्थिनी होती आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून, करिअर घडवण्याच्या दिशेने ती काम करत होती. पण कदाचित नशिबाच्या मनात काहीतरी वेगळेच होते, नोकरी मिळाल्यानंतर आणि नंतर ती गमावल्यानंतर परीने चित्रपट जगतात प्रवेश केला.
अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देऊन हुशार परिणीती चोप्रा 12 वीमध्ये वर्गात आणि देशात अव्वल आली आणि राष्ट्रपतींच्या हस्ते तिचा सन्मान देखील झाला. यानंतर तिने अर्थशास्त्र, व्यवसाय आणि वित्त विषयात पदवी मिळवली. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती नोकारीनिमित्ताने परदेशी गेली. 2009 मध्ये जेव्हा मंदी आली तेव्हा परी गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम करत होती आणि या मंदीमुळे तिला आपली नोकरी गमवावी लागली.
नोकरी गेल्यानंतर परिणीती भारतात परतली आणि इथे अनेक पदव्या असूनही तिला नोकरी मिळू शकली नाही. ती एकदा बहीण प्रियांका चोप्रासोबत एका स्टुडिओमध्ये गेली होती आणि इथे महिन्याला 2,000 रुपये या बोलीवर तिने इंटर्नशिप सुरु केली. आर्थिक स्थिती चांगली नव्हती, म्हणून परिणीतीने काम करण्याचा निर्णय घेतला, नंतर हळूहळू चित्रपटांकडे कल वाढल्यानंतर तिने ‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
परिणीतीचा रणवीर सिंहसोबतचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही. पण तिने पुढे बराच काळ आपली पुढची वाटचाल करण्याची तयारी केली होती. अर्जुन कपूरचा दुसरा चित्रपट ‘इश्कजादे’ यशस्वी झाला आणि त्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही.
अभ्यासात अव्वल असण्याव्यतिरिक्त आणि अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत: ला प्रस्थापित करण्याव्यतिरिक्त परिणीती चोप्राला गाण्याचीही आवड आहे. तिने बॉलिवूडमध्ये दोन गाणी देखील गायली आहेत, त्यातील एक ‘केसरी’ चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या ट्रॅकची महिला आवृत्ती होती, तर दुसरे ‘मान की हम यार नहीं’ हे गाणे होते.
परिणीतीच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. तिने ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘गोलमाल अगेन’, ‘नमस्ते लंडन’, ‘केसरी’, ‘जबरिया जोडी’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय काही चित्रपटांचे काम आता सुरु आहे. नुकतेच तिचे ‘संदीप और पिंकी फरार’, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि ‘सायना’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.