मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) 9 डिसेंबर रोजी त्यांचा 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म बिहारमधील पाटणा येथे झाला. शत्रुघ्न चार भावांमध्ये सर्वात लहान आहेत. ‘रामायण’पासून प्रेरित होऊन, त्यांच्या पालकांनी त्यांच्या चार मुलांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली. चला तर, ‘बिहारी बाबू’च्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया…
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पटना येथून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून डिप्लोमा केला. शत्रुघ्न सिन्हा मुंबईत आले आणि अभिनेते देव आनंद यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला. देव आनंद यांच्या प्रेम पुजारी या चित्रपटात पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. 1969 मध्ये त्यांनी मोहन सहगल यांच्या ‘साजन’ चित्रपटात पोलिस इन्स्पेक्टरची छोटीशी भूमिका केली होती.
चित्रपटांमध्ये काम करत असतानाच, त्यांची एकदा माजी मिस इंडिया पूनम सिन्हा (तेव्हाच्या पूनम चंदिरमणी) यांच्याशी भेट झाली. पूनम यांनाही अभिनयात करिअर करायचे होते. त्या काही चित्रपटांमध्ये झळकल्या देखील होत्या. त्यांना पाहून शत्रुघ्न सिन्हा आपले हृदय हरवून बसले. हळूहळू त्याच्या भेटीगाठी वाढत गेल्या.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांना ट्रेनमध्ये प्रपोज केले होते. दोघेही फिरायला जात असताना फिल्मी स्टाईलमध्ये गुडघ्यावर बसून, त्यांनी पूनम यांना प्रेम पत्र देऊन प्रपोज केले. शत्रूघ्न यांनी मोठा भाऊ राम यांच्याकडे पूनम यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर राम सिन्हा पूनम यांच्या आईच्या घरी त्यांच्या धाकट्या भावाच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन भेटण्यासाठी गेले.
शत्रुघ्नशी लग्न करण्याच्या पूनम यांच्या निर्णयाचा त्यांच्या आईला प्रचंड राग आला होता. त्या म्हणाल्या, ‘माझी मुलगी दुधासारखी गोरी आहे आणि तो मुलगा कसा आहे, तोही चोरासारखा वागतो. तो माझ्या मुलीशी कसा लग्न करू शकतो?’ त्यादिवशी हे बोल ऐकून राम सिन्हा पुन्हा घरी आले. पण, नंतर दोघेही आपापल्या पद्धतीने घरच्यांशी बोलले आणि नंतर दोघांच्या लग्नाला संमती मिळाली.
शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्यापैकी ‘कालीचरण’, ‘विश्वनाथ’, ‘दोस्ताना’, ‘शान’, ‘क्रांती’, ‘नसीब’ आणि ‘काला पत्थर’ हे काही प्रमुख चित्रपट आहेत. ‘मेरे अपने’ चित्रपटातील ‘चेनू’ ही व्यक्तिरेखा साकारून शत्रूघ्न सिन्हा खूप प्रसिद्ध झाले.
Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी-कतरीनाच्या लग्नात पाहुण्यांना पाळावे लागणार हे नियम