इतिहासातली काही वादग्रस्त पानं जेव्हा नव्याने एखाद्या चित्रपट किंवा वेब सीरिजच्या माध्यमातून येतात, तेव्हा त्या घटनेच्या बाजूने आणि त्या विरोधात असे दोन गट नेहमी पडतात. खुद्द पंतप्रधानांनी विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाचं कौतुक केलं आणि देशभर त्याच गोष्टीवरून सामाजिक आणि राजकीय मतभेदाचा वणवा पेटला. इस्लामचा स्वीकार करा, काश्मीर सोडा किंवा मृत्यूला सामोरं जा.. हा नारा देत दहशतवाद्यांनी 1990 मध्ये काश्मीरमधील हिंदूवर हल्ला चढवला होता. काश्मिरी पंडितांना (Kashmiri Pandits) बेघर करून त्यांची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मात्र हे सत्य तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा या चित्रपटात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काश्मिरी पंडितांची हत्या केल्याच्या घटना जरी सत्य असल्या तरी याच काळात काश्मिरी मुसलमानांचीही हत्या करण्यात आली होती, त्याबद्दल या चित्रपटात काहीही म्हटलेलं नाही, असा आरोपही दिग्दर्शकांवर होत आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर IAS अधिकारी नियाज खान (Niyaz Khan) यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. ‘द काश्मीर फाईल्समध्ये ज्याप्रकारे काश्मिरी पंडितांचं दु:ख दाखवण्यात आलं आहे, त्याचप्रकारे आता निर्मात्यांनी देशातील मुसलमानांच्या हत्यांवरही चित्रपट बनवला पाहिजे, कारण मुसलमान किटक नाहीत तर या देशाचे नागरिक आहेत, तीसुद्धा माणसं आहेत’, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.
नियाज खान यांचं ट्विट-
द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून जो वाद सुरू आहे, त्यावर नियाज यांनी स्वत:चं मत मांडलं आहे. ‘द काश्मीर फाईल्स ब्राह्मणांचं दु:ख दाखवतं. त्यांना सन्मानाने आणि सुरक्षितपणे काश्मीरमध्ये राहण्याची परवानगी दिली पाहिजे. त्याचसोबत निर्मात्यांनी विविध राज्यांतील मुस्लिमांच्या हत्येवरही चित्रपट बनवला पाहिजे. ते सुद्धा या देशाचे नागरिक आहेत, किटक नाहीत’, अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे. याचसोबत त्यांनी पुढे लिहिलं, ‘मी मुस्लिमांच्या नरसंहारावर पुस्तक लिहायचा विचार करतोय, जेणेकरून द काश्मीर फाईल्ससारखे निर्माते पुढे येऊन या चित्रपटाची निर्मिती करतील. त्यामुळे अल्पसंख्याकांचं दु:ख भारतीयांसमोर आणता येईल.’
Kashmir File shows the pain of Brahmins. They should be allowed to live safely in Kashmir with all honour. The producer must also make a movie to show the killings of Large number of Muslims across several states. Muslims are not insects but human beings and citizens of country
— Niyaz Khan (@saifasa) March 18, 2022
Thinking to write a book to show the massacre of Muslims on different occasions so that a movie like Kashmir Files could be produced by some producer, so that, the pain and suffering of minorities could be brought before Indians
— Niyaz Khan (@saifasa) March 18, 2022
कोण आहेत नियाज खान?
नियाज खान हे मध्यप्रदेश पीडब्लूडीमध्ये उपसचिव पदावर कार्यरत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत काही पुस्तकंसुद्धा लिहिली आहेत. नियाज हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या धर्माची हिंसक प्रतिमा पुसून टाकण्यासाठी नियाज हे संशोधनही करत आहेत. इस्लामला बदनाम करण्यामागे अनेक संघटनांची वाईट प्रतिमा असल्याचं त्यांचं मत आहे. नियाज यांनी आतापर्यंत सहाहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या एका कादंबरीवर ‘आश्रम’ ही वेब सीरिज बनवण्यात आली आहे. या वेब सीरिजमध्ये त्यांना श्रेय न मिळाल्याने नियाज यांनी आश्रमचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. इस्लामची प्रतिमा जगात सुधारण्यासाठी नियाज हे कुराणवर संशोधन करत आहेत. मुहम्मद यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकांचा अभ्यास करून त्यांना त्यांचं संशोधन पुस्तक युरोपमधून प्रकाशित करून घ्यायचं आहे. मी सर्व धर्मांना मानतो आणि मी शाकाहारी आहे, असा दावा ते करतात. नुकतंच त्यांनी इराकमधील याझिदींवर एक नवीन पुस्तक लिहिलं आहे. बी रेडी टू डाय असं या पुस्तकाचं नाव असून त्यात त्यांनी उत्तर इराकमधील यझिदी हे हिंदूंचेच स्वरूप असल्याचं सांगितलं आहे. तेही हिंदूंप्रमाणे सूर्य आणि अग्नीचे उपासक आहेत. नियाज खान याआधी हिजाब वादावरील ट्विटमुळे चर्चेत होते. ‘हिजाब आपल्याला प्रदूषणापासून सुरक्षित ठेवतो. हिजाबला प्रोत्साहन द्या जेणेकरून लोक कोरोना आणि वायू प्रदूषणापासून सुरक्षित राहू शकतील’, असं ते म्हणाले होते.
वादाचा कमाईसाठी फायदा
द काश्मीर फाईल्सला भाजप नेत्यांकडून मिळालेलं समर्थन खूप परिणामकारक ठरलंय. गोवा, मध्य प्रदेश, आसाम, कर्नाटक याठिकाणी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली, परंतु यावर बोलताना या चित्रपटाच्या आडून राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी भूमिका गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून सुरू झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. या सगळ्यांचा एक चांगला परिणाम म्हणजे चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करतोय. अवघ्या आठ दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.
हेही वाचा:
‘जय संतोषी माँ’बाबत जे घडलं तेच 47 वर्षांनंतर The Kashmir Files बाबत घडतंय; पुन्हा घडणार इतिहास?
Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही… जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!