सोशल मीडियावर एखादं वृत्त किंवा माहिती वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होते. मात्र याचा अनेकदा सेलिब्रिटींना मोठा फटका बसतो. त्यांच्या अफेअर्सपासून ते अगदी निधनापर्यंतच्या अफवा सोशल मीडियावर क्षणार्धात पसरवल्या जातात. अशा अनेक सेलिब्रिटींच्या निधनाच्या अफवा (fake reports) आजवर सोशल मीडियावर पसरल्या आहेत. असाच अनुभव अभिनेता फरदीन खानला (Fardeen Khan) आला. एकदा नव्हे तर दोनदा त्याच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावरून पसरल्या होत्या. एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी होती. अशी खोटी बातमी जेव्हा कुटुंबीय किंवा मित्र वाचतील, तेव्हा त्यांना काय वाटेल याबाबत तो व्यक्त झाला. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत फरदीनने फेक न्यूजबद्दल संताप व्यक्त केला. (death hoax)
“माझा अपघातात मृत्यू झाला अशा अफवा दोनदा पसरवल्या गेल्या होत्या. ते वाचून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. माझ्या आईने ती बातमी पाहिली किंवा वाचली असती तर तिला हार्ट अटॅकच आला असता. माझ्या पत्नीपर्यंत किंवा मित्रमैत्रिणींपर्यंत ती फेक न्यूज पोहोचली असती तर काय झालं असतं, याचा विचारच करू शकत नाही मी. अर्जुन रामपालने मला मेसेज करून विचारलं होतं की मी ठीक आहे का? मी जिवंत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्याने तो मेसेज केला असावा”, असं त्याने सांगितलं.
फरदीन खान बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुल्हा मिल गया’ या चित्रपटात फरदीनने सुष्मिता सेनसोबत काम केलं होतं. त्यानंतर आता तो हॉरर ड्रामा ‘विस्फोट’मध्ये झळकणार आहे. यामध्ये रितेश देशमुख, प्रिया बापट, क्रिस्टल डिसूझा यांच्याही भूमिका आहेत. गेल्या महिन्यात या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली. कुकी गुलाटी दिग्दर्शित हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉक, पेपर अँड सिझर्स’ या व्हेनेझुएलन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.
हेही वाचा: