अभिनेता रणवीर सिंगच्या ‘जयेशभाई जोरदार’ (Jayeshbhai Jordaar) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणवीर (Ranveer Singh) पुन्हा एकदा गुजराती व्यक्तीची भूमिका साकारतोय. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटात त्याचा गुजराती अंदाज पहायला मिळाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जयेशभाईच्या भूमिकेतील रणवीर हा त्याच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी कुटुंबीयांविरोधात लढताना दिसत आहे. कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण सामाजिक संदेशसुद्धा देण्यात आला आहे. मुलगाच हवा असा हट्ट करणाऱ्या कुटुंबीयांना चपराक लावणारा हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीरसोबत बोमन इराणी, रत्ना पाठक शाह आणि शालिनी पांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. (Jayeshbhai Jordaar trailer)
बोमन इराणी आणि रत्ना पाठक शाह यांनी रणवीरच्या आई-वडिलांची भूमिका साकारली आहे. जुन्या विचारसरणीचे गावातील सरपंच (बोमन) आणि त्याच विचारसरणीला पाठिंबा देणारी त्यांची पत्नी (रत्ना) यांना नातूच हवा असतो. जयेशभाईची पत्नी गरोदर असते आणि तिला मुलगी होणार असल्याचं जेव्हा डॉक्टर सांगतात, तेव्हा मुलीचा जीव वाचवण्यासाठी जयेशभाई वाट्टेल ते करण्यासाठी तयार होतो. एक सामान्य माणूस आपल्या मुलीला वाचवण्यासाठी गरोदर पत्नीसह आपल्या कुटुंबापासून दूर पळून जाण्याची हिम्मत कशी मिळवतो, याची झलक या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे. चित्रपटात कॉमेडीचा जबरदस्त तडका आहे.
Jai Mataji! #JayeshbhaiJordaar TRAILER OUT NOW! Celebrate #JayeshbhaiJordaar with #YRF50 only at a big screen near you on 13th May! pic.twitter.com/NQq5yepmBT
— Yash Raj Films (@yrf) April 19, 2022
अभिनेते दिव्यांग ठक्कर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. विशाल-शेखर आणि अमित त्रिवेदी यांनी या चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केलं आहे. येत्या 13 मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा:
Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’च्या शूटिंगदरम्यान रुपाली भोसलेला दुखापत