मुंबई : आज (11 नोव्हेंबर) बॉलिवूडचे महान कॉमेडियन जॉनी वॉकर (Johnny Walker) यांची जयंती आहे. त्यांचा जन्म इंदूरला झाला होता. त्यांच्या आयुष्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. त्यांचं बालपण गरिबीत गेलं, तरुणपणी संघर्ष करत त्यांनी मुंबई गाठली आणि मग अचानक त्यांचं आयुष्यच बदललं. त्यांनी त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये दारुड्याची भूमिका केली आहे. त्यांच्या कॉमिक टायमिंगने सर्वांनाच वेड लावले होते. त्यांनी त्यांच्या काळातील सर्व मोठ्या चित्रपट निर्मात्यांसोबत काम केले. त्यांच्यावर चित्रित केलेले ‘सर जो तेरा चक्रये…’ हे गाणे आजही लोक गुणगुणतात.
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असा अभिनेता ज्याने दारूला कधी हातही लावला नाही, पण पडद्यावर त्याने मद्यपीची भूमिका केल्यावर यापेक्षा मोठा गदारोळ कोणताच नाही असे पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटले. जॉनी वॉकर यांचे खरे नाव बदरुद्दीन जमालुद्दीन काझी होते, परंतु चित्रपट विश्वामध्ये त्यांनी जॉनी वॉकर हे नाव धारण करून काम केले.
जॉनी वॉकर या नावामागे देखील एक रंजक कथा आहे. असे म्हटले जाते की जॉनीने सुरुवातीला त्याच्या खऱ्या नावाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. बहुतेक चित्रपटांमध्ये मद्यपीची भूमिका साकारल्यामुळे चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते गुरु दत्त यांनी त्यांचे नामकरण केले आणि लोकप्रिय व्हिस्की ब्रँडवर त्यांचे नाव जॉनी वॉकर ठेवले.
11 नोव्हेंबर 1920 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेल्या जॉनी वॉकरचे आई-वडील एका कारखान्यात काम करायचे. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने जॉनी यांनीही लहानपणापासूनच काम करायला सुरुवात केली. इंदूरमधला तो कारखाना बंद झाल्यावर जॉनी वॉकरचे संपूर्ण कुटुंब कामाच्या शोधात मुंबईला आले. पण मुंबईतलं आयुष्य तितकं सोपं नव्हतं. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबासाठी दोन पैसे कमावण्यासाठी जॉनी यांनी बस कंडक्टरची नोकरी पत्करली. त्या काळात त्यांना 26 रुपये दरमहा पगार मिळत असे. यातही जॉनी आपल्या स्टाईलने बसमधील प्रवाशांचे मनोरंजन करत आपले काम करत असे. इतक्यात बलराज साहनी यांनी त्यांना संधी देण्याचे ठरवले.
बलराज साहेबांनी जॉनी वॉकरला एकदा दिग्दर्शक गुरु दत्त यांना भेटायला सांगितले. गुरू दत्त त्यावेळी त्यांच्या ‘बाजी’ चित्रपटाच्या शूटिंगच्या तयारीत व्यस्त होते. जॉनी वॉकरने गुरू दत्तसमोर दारुड्याचा अभिनय केला. दारूच्या थेंबालाही स्पर्श न करता त्यांचा हा अट्टल मद्यपीचा अभिनय गुरू दत्त यांना खूप आवडला. त्यामुळे त्यांना पहिला ब्रेक ‘बाजी’ चित्रपटात मिळाला, त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
जॉनी वॉकरने आपल्या चित्रपट प्रवासात सुमारे 300 चित्रपट केले, ज्यात ‘जल’, ‘आंधियां’, ‘नया दौर’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुधामती,’ ‘कागज के फूल’, ‘गेटवे ऑफ इंडिया’, ‘मिस्टर सुपरहिट’. ‘मेरे मेहबूब’, ‘साईआयडी’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. जॉनी वॉकर यांना पहिला फिल्मफेअर अवॉर्ड कॉमेडीसाठी नव्हे, तर ‘मधुमती’ चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी मिळाला होता. यानंतर त्यांना ‘शिकार’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार देण्यात आला.
गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये खुललं अप्सरेचं सौंदर्य, पाहा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नवं फोटोशूट!