मुंबई : आजकाल आगामी रिजनल चित्रपट बरेच चर्चेत आहेत. सध्या चर्चेत असलेल्या असाच एका तमिळ चित्रपटाचे नाव आहे ‘विक्रम’ (Vikram). 1986मध्ये याच नावाचा चित्रपट बनवण्यात आला होता. हा एक स्पाय थ्रिलर होता, ज्यामध्ये कमल हासन (Kamal Hassan) मुख्य भूमिकेत होता. 1986चित्रपट ‘विक्रम’ हा गाणी रेकॉर्ड करण्यासाठी संगणकाचा वापर करण्यात आलेला पहिला भारतीय चित्रपट होता. एक कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेला हा पहिला दक्षिण भारतीय चित्रपटही होता.
‘विक्रम’ या नवीन रिलीजचा टीझर रिलीज झाला तेव्हा, 1986 च्या चित्रपटातील एका गाण्याची रीमिक्स आवृत्ती वापरली गेली. तेव्हापासून अशी चर्चा रंगली आहे की, हा 25 वर्षांपूर्वी आलेल्या ‘विक्रम’ चा रिमेक आहे. निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. पाहा ‘विक्रम’चा टीझर :
‘विक्रम’ च्या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे चित्रपटाची स्टारकास्ट. या चित्रपटात कमल हसनसोबत विजय सेतुपती (Vijay Sethupati) आणि फहाद फाजीलसारखे (Fahad Fazil) अभिनेते दिसणार आहेत. त्यामुळे चित्रपटाकडून अपेक्षा अचानक खूप वाढल्या आहेत. मात्र, कमल हसनचा या आधीचा ‘विश्वरूपम 2’ हा चित्रपट सपाटून आपटला आहे. म्हणूनच ‘विक्रम’साठी प्रत्येक योजना नव्याने केली जात आहे, जेणेकरून चित्रपट हिट होऊ शकेल. कमल हासन बऱ्याच काळापासून तमिळ चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. अलीकडच्या काळात विजय सेतुपती तमिळ सिनेमाच्या सर्वात विश्वासार्ह आणि नव्या कथांवर आधारित चित्रपटांचा स्टार म्हणून उदयास आला आहे. एका चित्रपटात त्याची उपस्थिती त्या चित्रपटाचा गल्ला वाढवते. फहाद फाजीलची गणना मल्याळी भाषेतच नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. या चित्रपटाची कास्टिंग मल्याळी प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून केली गेली आहे. फहादचा हा तिसरा तमिळ चित्रपट आहे. यापूर्वी त्यांनी ‘वेल्लकरन’ आणि ‘सुपर डिलक्स’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
कमल हसन ‘विक्रम’मध्ये निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. तर विजय सेतुपती या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे. फहादची भूमिका एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे, जो नंतर भ्रष्ट नेता बनतो. यापूर्वी राघव लॉरेन्सला या भूमिकेत कास्ट करण्यात आले होते. राघव हे पहिले नृत्यदिग्दर्शक होते. त्यानंतर चित्रपटांचे दिग्दर्शन सुरू केले. आणि आता ते एक अभिनेता म्हणून ओळखले जातात. नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा त्याच्या चित्रपटावर आधारित होता. राघवने त्याच्या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे दिग्दर्शनही केले. पण त्याच्या आधीच्या कमिटमेंट्स लक्षात ठेवून त्याने ‘विक्रम’ मधून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हे अधिकृत कारण बनले आहे. पण खरे कारण दुसरेच आहे.
राघव लॉरेन्स रजनीकांत यांच्या ‘दरबार’ चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमाला पोहोचले होते. जेथे त्याने सांगितले होते की, लहानपणी तो रजनीकांतचा इतका मोठा चाहता होता की, कमल हासनच्या चित्रपटांच्या पोस्टर्सवर शेण फेकत असे. मूर्तीपूजेची संस्कृती अजूनही दक्षिण भारतात दिसून येते. लोक त्यांच्या स्टार्सबद्दल खूप सकारात्मक आहेत. एका मोठ्या वर्गाला रजनीकांत आवडतात आणि दुसऱ्याला कमल हसन. या दोन मेगास्टारच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या आवडत्या स्टारला चांगले आणि मोठे सिद्ध करण्याची स्पर्धा रंगलेली असते. अशा परिस्थितीत रजनीकांतच्या कार्यक्रमाला जाऊन कमल हसनबद्दल असे बोलणे कमलच्या चाहत्यांचा संताप ओढवून घेणारे दिसले. या कृत्याबद्दल राघव लॉरेन्सला फटकारण्यात आले. या सगळ्या वादाच्या दरम्यान, राघव कमल हासनच्या घरी गेला आणि त्यांना आपला मुद्दा सांगितला. यानंतर प्रकरण शांत झाले.
कमल, विजय आणि फहाद सोबत, कालिदास जयराम, अर्जुन दास आणि नारायण सारखे कलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटातील नायिकेचा शोध अद्याप सुरू आहे.
लोकेश कनगराज ‘विक्रम’ चे दिग्दर्शन करत आहेत. लोकेशने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण तीन चित्रपट केले आहेत. तिन्ही चित्रपटांनी यशाचे झेंडे रोवले आहेत.. लोकेशने 2016 मध्ये ‘अवियल’ या एन्थॉलॉजी चित्रपटाद्वारे पदार्पण केले. या चित्रपटाच्या चार कथांचे एकूण पाच दिग्दर्शक एकत्र दिग्दर्शित करण्यात आले होते. या चित्रपटात लोकेशने ‘कलम’ नावाच्या भागाचे दिग्दर्शन केले होते. 2017मध्ये आलेला ‘मनागराम’ हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट होता, जो सुपरहिट ठरला. यानंतर त्यांनी कार्तीसोबत ‘कैथी’ नावाचा चित्रपट बनवला, जो ब्लॉकबस्टर ठरला. अजय देवगणने हा चित्रपट हिंदीमध्ये रिमेक करण्याची घोषणा केली आहे.
लोकेशचा ‘मास्टर’ चित्रपट जानेवारी 2021 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट कोरोनाकाळात प्रदर्शित झाला. असे असूनही, थलापति विजय आणि विजय सेतुपती यांच्या स्टार पॉवरमुळे या चित्रपटाने देश आणि जगातून 200 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. यासह, चित्रपटाच्या कंटेंटचे समीक्षकांनी कौतुक केले. अशा परिस्थितीत, लोकेश कनगराज यांच्याकडे एक चित्रपट निर्माता म्हणून पाहिले गेले, जे लॉकडाऊनमध्येही ब्लॉकबस्टर चित्रपट देऊ शकतात. ‘मास्टर’ चे हिंदी रिमेक अधिकार ‘कबीर सिंग’चे निर्माते मुराद खेतानी यांनी विकत घेतल्याची चर्चा आहे. हा चित्रपट सलमान खानसोबत हिंदीत बनवला जाईल. मात्र, या चित्रपटाच्या रिमेकच्या स्क्रिप्टवर अद्याप काम सुरू आहे.
कमल हसन ‘विक्रम’ मध्ये निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटात कमल हासन तरुण दिसण्यासाठी डिजिटल डी-एजिंग नावाचे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. हे तेच तंत्र आहे ज्याद्वारे द आयरिशमन चित्रपटात रॉबर्ट डीनिरो आणि अल पचिनो यांचे वय कमी केले गेले. असे सांगितले जात आहे की, कमल हसन यांना या चित्रपटाच्या काही सीक्वेन्समध्ये तरुण दाखवण्यासाठी 10 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ही इतकी मोठी रक्कम आहे, ज्यात सहजपणे एक प्रादेशिक चित्रपट बनू शकतो.
‘विक्रम’ एक भव्य चित्रपट बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नाहीय. यशच्या KGF- चॅप्टर 1 स्टंट डिझाईन करणारी जोडी अनबू आणि अरिवु यांना या चित्रपटात सामील करण्यात आले आहे. ही स्टंट दिग्दर्शक जोडी ‘विक्रम’ चित्रपटाचे सर्व अॅक्शन सीक्वेन्स डिझाईन करत आहे. लोकेश कनगराज यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर ही माहिती दिली. केजीएफ व्यतिरिक्त, अंबू आणि अरिवु जोडीने सलमान खानच्या ‘राधे’ आणि रवी तेजाच्या ‘खिलाडी’साठी स्टंटही डिझाईन केले. लोकेश कनगराज यांच्या ‘कैथी’ चित्रपटाचे स्टंट देखील या जोडीने डिझाईन केले होते.
कमल हसनचा ‘विक्रम’ ज्या पद्धतीने बनवला जात आहे, त्याबद्दल मनोरंजन जगतातही खूप उत्साह आहे. प्रत्येकाला वाटत आहे की, भरपूर पैसे येणार आहेत. याचाच परिणाम असा झाला की, चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर अल्पावधीत ‘विक्रम’ने 37 कोटींची कमाई केली. हा पैसा चित्रपटाच्या हिंदी डब आवृत्तीच्या अधिकारांच्या विक्रीतून आला आहे. गोल्ड माईन फिल्म्स नावाचे एक यूट्यूब चॅनेल आहे, जिथे तुम्हाला सर्व दक्षिण भारतीय चित्रपटांच्या हिंदी डब आवृत्त्या मिळतात. या सिनेमांचे यूट्यूब व्ह्यू 100-200 दशलक्षांपर्यंत सहज पोहोचतात. याच गोल्डमाईन फिल्म्सने ‘विक्रम’च्या डब केलेल्या हिंदी आवृत्तीचे अधिकार 37 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. या 37 कोटींमध्ये विजय सेतुपती, फहाद फाजील, दिग्दर्शक लोकेश कनगराज आणि चित्रपटावर काम करणाऱ्या सर्व तंत्रज्ञांचे वेतन कव्हर केले जाईल, असे सांगितले जात आहे.
कमल हसन ‘विश्वरूपम 2’ रिलीज झाल्यानंतर आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये व्यस्त होते.त्यांनी 16 जुलै 2021 पासून ‘विक्रम’ चे शूटिंग सुरू केले. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या कथेचा मोठा भाग एका रेस्टॉरंटमध्ये चित्रित होणार आहे. त्यामुळे ‘विक्रम’ची टीम एका रेस्टॉरंटमध्ये 60 दिवस शूट करेल. काही बातम्यांमध्ये असेही सांगितले जात आहे की, कमल हसनने अशा तंत्राचा शोध लावला आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगसाठी लागणारा वेळ कमी होईल. हे तंत्रज्ञान काय आहे याबद्दल स्पष्टता नाही. सध्या चित्रपटाचे शूटिंग जलद गतीने सुरू आहे. ‘विक्रम’च्या रिलीज डेटबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
Films : ‘या’ बिग बजेट चित्रपटांवर काम सुरू; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला