उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा दिला आणि त्यावर अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) व्यक्त झाली नाही तर नवलंच! आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून तिने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे. ‘लोकशाही हा एक विश्वास आहे आणि सत्तेच्या अहंकारात येऊन जो या विश्वासाला तोडतो, त्यांचा अहंकार तुटणंसुद्धा निश्चित आहे,’ असं ती म्हणाली. त्याचप्रमाणे हनुमान चालीसाचा (Hanuman Chalisa) संदर्भ देत तिने उद्धव ठाकरेंना टोमणा मारला. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी राजीनामा दिला. त्यामुळे बुधवारी रात्री महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
‘जेव्हा पाप वाढतं तेव्हा विनाश होतो आणि त्यानंतर सृष्टी निर्माण होते… अन् आयुष्याचं कमळ फुललं,’ असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत ती म्हणाली, “1975 नंतर ही वेळ भारतीय लोकशाहीतील सर्वांत महत्त्वपूर्ण वेळ आहे. 1975 मध्ये लोकनेता जे. पी. नारायण यांच्या एका आवाजाने ‘सिंहासन सोडा’ अशी घोषणा जनता करते. त्यावेळी सिंहासन पडलं होतं. 2020 मध्ये मी म्हटलं होतं की लोकशाही हा एक विश्वास आहे आणि सत्तेच्या अहंकारात येऊन जो या विश्वासाला तोडतो, त्यांचा अहंकार तुटणंसुद्धा निश्चित आहे. हे कोणत्या व्यक्ती विशेषची शक्ती नाही. ही शक्ती आहे सच्च्या चरित्राची आणि दुसरी गोष्ट म्हणजे हनुमानाला शिवाचं बारावं अवतार मानलं जातं. शिवसेनेनंच जर हनुमान चालिसावर बंदी आणली तर त्यांना शिवसुद्धा वाचवू शकत नाही.” कंगनाच्या या व्हिडीओला अवघ्या तासाभरात अडीच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
“माझी एकही माणूस माझ्याविरोधात उभा राहिला तर ते माझ्यासाठी लाजिरवाणं ठरेल. मला तो खेळच खेळायचा नाही. मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत कधीही नव्हती”, असं उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री फेसबुक लाईव्हद्वारे जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील शक्तिपरीक्षा मात्र टळली. या घडामोडींनंतर भाजपच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी आजच दावा केला जाणार आहे.