तो सीन आणि ते नावही वगळा; कंगनाच्या ‘एमर्जन्सी’तील 13 सीनला सेन्सॉर बोर्डाची ‘एमर्जन्सी’ कात्री

| Updated on: Sep 27, 2024 | 9:33 PM

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतच्या 'एमर्जन्सी' या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. इंदिरा गांधी आणि आणिबाणीचा काळ या सिनेमात दाखवण्यात आला आहे. त्या काळात नेमकं काय घडलं होतं, त्याची ही कहाणी आहे. हा सिनेमा 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण सेन्सॉर बोर्डाने या सिनेमातील काही दृश्य आणि संवादावर आक्षेप घेतला आहे. तसेच या सिनेमातील काही गोष्टींचा सोर्सही बोर्डाने मागितला आहे. त्यामुळे हा सिनेमा बोर्डाच्या कातरीत सापडला आहे.

तो सीन आणि ते नावही वगळा; कंगनाच्या एमर्जन्सीतील 13 सीनला सेन्सॉर बोर्डाची एमर्जन्सी कात्री
Kangana Ranaut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अभिनेत्री कंगना रनौतचा ‘एमर्जन्सी’ सिनेमा 6 सप्टेंबर रोजीच रिलीज होणार होता. पण हा सिनेमा सेन्सॉर बोर्डात अडकला आहे. त्यामुळेच हा सिनेमा वेळेवर रिलीज होऊ शकला नाही. मात्र आता सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला U/A सर्टिफिकेट दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तरीही हा सिनेमा कधी रिलीज होणार याची माहिती समोर आलेली नाही. सर्टिफिकेट दिल्यानंतरही बोर्डाने निर्मात्याला या सिनेमातील 13 सीन वगळण्यास सांगितले आहेत. यातील काही सीन तर अत्यंत वादग्रस्त होते. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने या सिनेमावर एमर्जन्सी कात्री चालवली आहे.

सेन्सॉर बोर्डाने सांगितल्यानुसार सिनेमातील सीन वगळल्यावरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. मात्र, या सिनेमातील सीन कापण्याबाबत विचार करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवाय, असं झी स्टुडिओने म्हटल्याचं सांगितलं जात आहे. या सिनेमात एकूण 13 बदल सूचवण्यात आले आहेत. त्यापैकी काही बदलांची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही तुमच्याशी ही माहिती शेअर करत आहोत.

‘एमर्जन्सी’त या गोष्टी बदलाव्या लागतील

  1. सर्वात आधी सेन्सॉर बोर्डाने सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर जोडायला सांगितलं आहे. हा चित्रपट सत्य घटनेवरून प्रेरित आहे. पण सिनेमात ज्या काही घटना दाखवल्या आहेत, त्या नाट्यमयरित्या दाखवण्यात आल्या आहेत, असं वाक्य सिनेमाच्या सुरुवातीला देण्यास सांगण्यात आलं आहे. म्हणजे या सिनेमात जे काही दाखवलं जात आहे, ते पूर्णपणे सत्य नाही हे प्रेक्षकांना कळावं हा त्यामागचा सेन्सॉर बोर्डाचा हेतू आहे.
  2. सिनेमाच्या सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा एक सीन आहे. चीनने आसामला भारतापासून वेगळं केलंय असं नेहरू म्हणताना दिसत आहे. सिनेमातील हा डायलॉग कुठे घेतला? त्याचा संदर्भ काय? बोर्डाने याचा सोर्स मागितला आहे. हा सिनेमा पाहताना सेन्सॉर बोर्डात इतिहास तज्ज्ञ बसले होते. त्यांच्याकडे नेहरूंच्या या विधानाचा कोणताही सोर्स नाही. त्यांनी हे विधान कधी ऐकलं किंवा वाचलेलं नाही. त्यामुळेच सिनेमात हा संवाद कुठून घेतला? त्याचा सोर्स मागण्यात आला आहे.
  3. संजय गांधी यांच्या व्यक्तीरेखेच्या संवादावरही बोर्डाने आक्षेप घेतला आहे. मतांची डील होत आहे, असं या संवादातून वाटतंय, त्यामुळे बोर्डाने आक्षेप घेतला आहे. या सीनमध्ये भिंडरावाले संजय गांधांनी म्हणतात, तुमच्या पक्षाला मतं हवीत आणि आम्हाला खालिस्तान.
  4. या सिनेमातील एका वादग्रस्त दृश्यावरही बोर्डाने हरकत घेतली आहे. एका सीनमध्ये एक शीख व्यक्ती कुणाला तरी गोळी घालतो. पण ती व्यक्ती मुळातच शीख समुदायातील नाही. त्यामुळे बोर्डाने हा सीन डीलिट करायला सांगितला आहे. त्याचबरोबर 2 मिनिटापासून ते 11 मिनिटापर्यंत सिनेमात हिंसा दाखवण्यात आली आहे. हा हिंसाचारही कमी करायला सांगण्यात आलं आहे.
  5. एका दृश्यात इंदिरा गांधी आणि आर्मी चीफची चर्चा होते. या चर्चेत अर्जुन दिवस साजरा करण्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे शीखांचे पाचवे गुरू अर्जुन यांची जयंती. अर्जुन दिवसाचा उल्लेख बोर्डाने काढायला सांगितला आहे. बोर्डाच्या सांगण्यानुसार, शीख समुदायात अशी कोणतीच परंपरा नाहीये.
  6. जर सिनेमात ओरिजनल फुटेज वापरले असतील तर तिथे एक वैधानिक माहिती देणारा मेसेज टाकला पाहिजे. म्हणजे त्या मेसेजमध्ये कोणतीही मुव्हमेंट असता कामा नये.
  7. सिनेमातील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, मग ती संख्या असेल, कुणाचं विधान असेल वा एखादा संदर्भ असेल त्या सर्वांचा सोर्स देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या गोष्टी तुम्ही कुठून घेतल्या त्याची माहिती द्या, असं बोर्डाने म्हटलं आहे.
  8. या सिनेमात तीन सीन असे आहेत की ज्यात भिंडरावालेची व्यक्तीरेखा फ्रेममध्ये नाही. पण त्याच्या नावाचा उल्लेख होतो. बोर्डाने निर्मात्यांना भिंडरावालेचं नाव हटवण्यास सांगितलं आहे. कारण नसताना हे नाव घुसवल्याचं बोर्डाचं म्हणणं आहे. बोर्डाने अजून कोणत्या कोणत्या गोष्टींवर आक्षेप घेतलाय त्याची माहिती समोर आलेली नाही.