बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा पिता बनला. यश आणि रुही अशी त्याच्या मुलामुलीची नावं आहेत. विविध मुलाखतींमध्ये करण त्यांच्या संगोपनाविषयी, एकल पालकत्वाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आई हिरू यांच्यासोबत मिळून करण त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतोय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने या गोष्टीचा खुलासा केला की आता त्याची मुलं त्याला त्यांच्या आईविषयी आणि जन्माविषयी प्रश्न विचारू लागले आहेत. मुलांच्या या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्याला आवश्यक ते मार्गदर्शन घ्यावं लागलं, असंही त्याने सांगितलंय.
फाये डिसूझा यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, “आमची मॉडर्न फॅमिली आहे. ही एक असामान्य परिस्थिती आहे. म्हणून मला मुलांच्या विविध प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. आमचा जन्म कोणाच्या पोटी झाला? आमची मम्मा ही खरी मम्मा नाही, ती आमची आजी आहे, अशा प्रश्नांचा भडीमार माझ्यावर होतोय. त्यासाठी मी स्वत: समुपदेशन घेण्यासाठी शाळेत जातोय. अशा परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, त्यांना काय उत्तरं द्यायची, हे सर्व मी समजून घेतोय. अर्थात हे सर्व सोपं नाही. किंबहुना पालक होणं कधीच सोपं नसतं.”
मुलांना काही असंवेदनशील बोलू नये, यासाठी खूप संघर्ष करावा लागत असल्याचंही त्याने म्हटलंय. “जेव्हा मी माझ्या मुलाला साखर खाताना पाहतो आणि मला दिसतंय की त्याचं वजन वाढतंय, तेव्हा मी त्याच्यावर चिडतो. एकदा मी त्याच्यावर असंच चिडलो होतो, पण नंतर मी त्याची माफी मागितली. कारण हेच वय आहे, जिथे त्याला त्याचं जीवन मनसोक्त जगायचं आहे. त्याने आनंदी आणि उत्साहाने राहावं अशी माझी इच्छा आहे. मी माझ्या आयुष्यात जे करू शकलो नाही, ते सर्व मी त्याला करायला सांगतो. मग ते क्रिकेट किंवा फुटबॉल खेळणं असो. पण नंतर माझंच मला प्रश्न पडतो की मी असा का वागतोय? मला असा पिता बनायचं नाहीये. त्यांच्यावर मला जाचक अटी लादायच्या नाहीत. त्यांनी त्यांचे निर्णय घेण्यासाठी सक्षम बनावं, अशी माझी इच्छा आहे”, असं तो पुढे म्हणाला.
2020 मध्ये यश आणि रुहीच्या वाढदिवसानिमित्त करणने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने लिहिलं होतं, ‘सोसायटी स्टेटसमध्ये मी एकल पालक आहे. पण प्रत्यक्षात मी एकल पालक नाही. माझी आई खूप सुंदर आणि भावनिकरित्या आमच्या मुलांचं संगोपन माझ्यासोबत मिळून करतेय. तिच्या भक्कम पाठिंब्याशिवाय मी इतका मोठा निर्णय कधीच घेऊ शकलो नसतो.’