अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांना सोशल मीडियावर एका अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची (death threats) धमकी देण्यात आली. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमैत्रिणींसह हे दोघं नुकतेच मालदिवला गेले होते. मालदिव व्हेकेशनचे बरेच फोटो आणि व्हिडीओ ते गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट करत होते. यादरम्यान त्यांना सोशल मीडियावर धमकी मिळाली असून त्यात नेमकं काय म्हटलंय हे अद्याप कळू शकलं नाही. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य राजपूत नावाचा एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून कतरिनाला स्टॉक करत होता. विकीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतरही तो कतरिनाला स्टॉक करत होता. अखेर विकीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
काही दिवसांपूर्वीच अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनाही पत्राच्या स्वरूपात जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाप्रमाणेच तुमचीही हत्या करू, असं त्यात लिहिलं होतं. या घटनेनंतर सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला बॉलिवूडमधील व्यक्तींकडून पैसे उकळायचे होते, हे तपासादरम्यान स्पष्ट झालं. सलमानने शुक्रवारी मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची दक्षिण मुंबईतील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्याने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra | Police register a case against an unidentified man and initiate an investigation for allegedly giving life threats to actors Katrina Kaif and Vicky Kaushal through social media. Case registered at Santacruz Police Station: Mumbai Police
(File photos) pic.twitter.com/hQTaTMnB9a
— ANI (@ANI) July 25, 2022
बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करलाही एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवला आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पत्र स्वराच्या वर्सोवा इथल्या निवासस्थानी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर तिने जवळच्या वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पत्र हिंदीत लिहिलेलं होतं आणि त्यात स्वराला शिवीगाळ करण्यात आली होती. वीर सावरकरांचा अपमान देशातील तरुण खपवून घेणार नाही, असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.