दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) प्रत्येक चित्रपटातून त्यांचा एक व्यक्ती म्हणून विशेष ठसा उमटला आहे. ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ यांसारख्या दमदार मराठी चित्रपटांनंतर त्यांनी ‘झुंड’च्या (Jhund) माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांच्या पहिल्यावहिल्या हिंदी चित्रपटाची प्रचंड उत्सुकता तर होतीच. शिवाय आमिर खान, धनुष यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या तोंडून ‘झुंड’चं कौतुक ऐकल्यानंतर चित्रपटाची ‘माऊथ पब्लिसिटी’ जोमाने सुरू झाली. प्रदर्शनाच्या दिवशीच या चित्रपटावरून सोशल मीडियावर दोन गट पडले. एका गटाने नागराज यांच्या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. तर दुसऱ्या गटाने चित्रपटाला सोडून दुसऱ्या विषयांवरून त्यावर विनाकारण टीका करण्यास सुरुवात केली. अशा टीकाकारांना दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. नागराज यांच्या ‘झुंड’ चित्रपटाबाबत केदार यांनी ट्विट केलं आहे.
केदार शिंदेंचं ट्विट-
‘जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही,’ अशा शब्दांत केदार शिंदेंनी उत्तर दिलं आहे. याचसोबत त्यांनी #झुंडसिनेमाम्हणूनपाहा असा हॅशटॅग वापरला आहे. केदार शिंदेंच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. #झुंडसिनेमाम्हणूनपाहा
— Kedar Shinde (@mekedarshinde) March 5, 2022
लेखिका शेफाली वैद्य यांनी केली नागराज मंजुळेंवर टीका
“इतका राग होता ‘उच्चवर्णिय प्रस्थापितांवर’ तर मग मुख्य भूमिकेत अमिताभ कशाला?”, अशा शब्दात शेफाली यांनी टीका केली. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत आपली मतं मांडली आहेत. “चित्रपटात कुणाला घ्यायचं हा दिग्दर्शकाचा प्रश्न आहे त्यांना ते ठरवू द्या”, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर त्याला उत्तर देताना शेफाली “कुणी काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तुम्हाला हवं तितक्यांदा हा सिनेमा बघा…”, असं म्हणाल्या आहेत.
‘झुंड’च्या कमाईच्या आकड्याने केली निराशा
‘झुंड’ या चित्रपटाने शुक्रवारी प्रदर्शनाच्या दिवशी फक्त 1.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ज्या पद्धतीने या चित्रपटाचं प्रमोशन झालं, त्याच्याउलट कमाईचा हा आकडा पहायला मिळाला. दुसरीकडे ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘पावनखिंड’ यांसारख्या चित्रपटांनी मात्र बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली.
हेही वाचा:
कोण आहेत विजय बारसे? ज्यांच्यावर नागराज मंजुळेंनी बनवला ‘झुंड’ चित्रपट
सोलापुरात नागराजच्या ‘झुंड’ची जादू; 15-16 वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवलं!