मुंबई : ‘महाभारत’ या ऐतिहासिक टीव्ही मालिकेत शकुनी मामाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते गूफी पेंटल रुग्णालयात दाखल झाले आहेत. गूफी पेंटल यांची प्रकृती चिंताजनक अस्लयाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचं सांगितलं जात आहे. गूफी पेंटल यांची महाभारतातील शकूनी मामाची भूमिका प्रचंड गाजली होती. शकूनी मामा म्हणजेच गूफी पेंटल असं चित्र त्यावेळी निर्माण झालं होतं. महाभारतानंतर पेंटल यांनी अनेक सिनेमा आणि सीरियल्समध्ये काम केलं. पण शकूनी मामा हीच त्यांची ओळख कायम राहिली होती. लोकांना अजूनही त्यांचं खरं नाव माहीत नाही. त्यांना आजही शकूनी मामा म्हणूनच ओळखलं जातं.
गूफी पेंटल यांची प्रकृती खराब झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आता त्यांची प्रकृती सुधारत आहे. ते उपचाराला साथ देत आहे. डॉक्टरांनीही त्यांच्या तब्येतीची माहिती दिली. त्यांना रुग्णालयात आणलं तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत खराब होती. आता त्यात थोडी सुधारणा झाली आहे, असं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. त्यांची प्रकृती ठणठणीत बरी व्हावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
अभिनेत्री टीना घई यांनी पेंटल यांची प्रकृती माहिती देणारी पोस्ट शेअर केली होती. गूफी पेंटल आजारी आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना बरं वाटावं म्हणून देवाकडे प्रार्थना करा, असं आवाहन टीना घई यांनी लोकांना केलं होतं.
पेंटल हे 78 वर्षाचे आहेत. त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. या आवडीपोटीच त्यांनी इंजीनिअरिंगच शिक्षण सोडून मुंबई गाठली होती. त्यांनी अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी मुंबईत आल्यावर मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक सिनेमे आणि सीरियल्समध्ये कामे केली. पेंटल यांनी महाभारत, अकबर बीरबल, सीआयडी आणि राधाकृष्णा आदी टीव्ही सीरिअल्समध्ये काम केलं आहे. बीआर चोपडा यांच्या महाभारत सीरिअल्समध्ये त्यांनी शकुनी मामाची व्यक्तिरेखा साकारली होती. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.
पेंटल यांनी सीरिअल्स शिवाय सुहाग, दावा, देश परदेस, घूम आदी सिनेमातही काम केलं आहे. त्यांनी मोठ्या पडद्यावर वडिलांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. पेंटल यांनी काही सिनेमांची निर्मितीही केली होती. 1993मध्ये त्यांची पत्नी पेखा पेंटल यांचा मृत्यू झला होता. त्यानंतर ते एकाकी पडले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी सिनेमा आणि मालिकांमध्ये काम सुरू ठेवलं होतं.