मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटाचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. 2 ऑक्टोबर रोजी अयोध्येत या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी आदिपुरुषचं दिग्दर्शन केलं आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासून ट्विटरवर यातील विविध भूमिकांवरून, VFX वरून चर्चा सुरू झाली. या सर्व चर्चांदरम्यान तुम्ही हनुमानाची (Hanuman) भूमिका कोणत्या कलाकाराने साकारली, हे ओळखू शकलात का? मराठी कलाविश्वातील एका सुप्रसिद्ध कलाकाराने ही भूमिका साकारली आहे.
‘जय मल्हार’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेने आदिपुरुषमध्ये हनुमानाची भूमिका साकारली आहे. खंडोबाच्या भूमिकेतून देवदत्त घराघरात पोहोचला. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं. ‘जय मल्हार’सोबतच त्याने ‘वीर शिवाजी’, ‘देवयानी’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे.
If this is Bollywood’s Hanumaan, people have the right to get offended.
Hanuman has more temples than Lord Rama, and people are supposed to keep leather products out of His temple.But in Bollywood, seemingly the Mighty Hanumaan is wearing Leather belts wrapped around him. Wow pic.twitter.com/TS1mhO6TlS
— AKTK (@AKTKbasics) October 3, 2022
ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी’ या चित्रपटात देवदत्तने सूर्याजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. योगायोग म्हणजे वीर शिवाजी या मालिकेत देवदत्तने तान्हाजीची भूमिका साकारली होती. देवदत्तने मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’, ‘सत्यमेव जयते’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तो झळकला आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला देवदत्तने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आदिपुरुषमधील भूमिकेबद्दल भाष्य केलं होतं. भगवान हनुमानाशी अनोखं कनेक्शन असल्याचं त्याने सांगितलं होतं. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने जिममध्ये व्यायामाला सुरुवात केली होती. त्या जिमचं नाव हनुमान व्यायामशाळा असं होतं. आदिपुरुषच्या शूटिंगदरम्यान प्रभास, सनी सिंह, कृती सनॉन आणि सैफ यांच्यासोबत चांगली मैत्री झाल्याचंही त्याने सांगितलं.
आदिपुरुषमधील हनुमानाच्या लूकवरून नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. या चित्रपटाचा टीझर सध्या ट्विटरवर ट्रेंड होत असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होतोय.