कोलकाता |10 फेब्रुवारी 2024 : प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना कोलकाताच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखू लागलं आणि अस्वस्थ वाटल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आला. मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक आला आहे. वैद्यकीय भाषेत या आजाराला सेरेब्रल व्हॅस्कुलर एक्सिडेंट म्हटलं जातं. किंवा मेंदूचा अटॅकही म्हटलं जातं. आजाराचं निदान झाल्याबरोबर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मिथून यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. हा स्ट्रोक खूप मायनर होता. वेळेत उपचार मिळाल्याने त्यांच्यावरील धोका टळला असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.
मिथुन चक्रवर्ती यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाकडून हेल्थ बुलेटिन जारी करण्यात आलं आहे. मिथुन चक्रवर्ती जेव्हा रुग्णालयात दाखल झाले तेव्हा लक्षणांच्या आधारे तपासणी करण्यात आली. यावेळी एमआरआयही करण्यात आला. एमआयआरएमध्येच मिथुन यांना सेरेब्रल व्हॅस्क्युलर एक्सिडेंट म्हणजेच ब्रेन स्ट्रोक झाल्याचं आढळून आलं आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या कार्डियाव्हॅस्क्युलर आणि गॅस्ट्रोच्या डॉक्टरांच्या निगराणी खाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सेरेब्रल व्हॅस्क्युलर एक्सिडेंट म्हणजे ब्रेन स्ट्रोक हा आजार भारतात अनेकांना होतो. जीटीबी हॉस्पिटलचे रेसिडेंट डॉ. अंकित कुमार यांच्या म्हणण्यानुसार, सेरेब्रल व्हॅस्क्युलर एक्सिडेंटला स्ट्रोक म्हटलं जातं. हा मेंदूत होतो. मेंदूत ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने ही समस्या होते. जर वेळेत त्यावर उपचार झाले नाही तर लकवा मारतो. मात्र, वेळेत आजाराची लक्षणे समजली आणि उपचार झाला तर कोणताही धोका राहत नाही. स्ट्रोक आल्यानंतर एक दोन तासात रुग्ण जर रुग्णालयात आला तर तो सहज वाचू शकतो. स्ट्रोकची लक्षणे लगेच दिसतात. यात अस्वस्थ वाटणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अंधुक दिसणे आणि बोलणे किंवा चालण्यात अडचणी येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
स्ट्रोकची समस्या कोणत्याही वयात येते. मात्र, वाढत्या वयानंतर त्याची रिस्क अधिक आहे. डायबिटीज आणि लठ्ठपणा असणाऱ्यांना लोकांमध्ये या आजाराची रिस्क अधिक असते. तसेच स्मोकिंग करणाऱ्यांनाही याचा धोका अधिक असतो. मात्र, स्ट्रोकची लक्षणे दिसताच जर रुग्ण रुग्णालयात आला तर त्याचा जीव वाचू शकतो. इतकंच नाही तर तो पूर्ण बरा होऊ शकतो. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच रुग्णालयात जाणं महत्त्वाचं आहे, असं डॉ. अंकित यांनी सांगितलं.