मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रतिक्षा बंगल्याबाहेर मनसेने पोस्टरबाजी केली आहे. अमिताभ बच्चन यांचा जुहू चौपाटी या ठिकाणी असलेला प्रतिक्षा बंगल्याचा काही भाग रस्ते रुंदीकरण प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांनी प्रतिक्षा बंगल्यावर पोस्टरबाजी केली आहे. (MNS Poster in front of Amitabh Bachchan Pratiksha bungalow)
मनसेने प्रतिक्षा बंगल्यासमोर काही बॅनर लावले आहेत. त्यात त्यांनी बिग “बी” आपला “बिग” हार्ट दाखवा, मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच “प्रतीक्षा”, असा मजकूर लिहिला आहे. अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जनतेला सहकार्य करावे, अशी पोस्टरबाजी मनसेने केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील जुहूच्या (juhu) संत ज्ञानेश्वर मार्गावर अमिताभ बच्चन यांचा प्रतिक्षा बंगला आहे. रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या अंतर्गत 2017 मध्ये बच्चन आणि अन्य बंगले मालकांना रस्ते रुंदीकरण प्रकल्पासाठी त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी पालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली होती. बहुतांश भूखंड मालकांनी प्रतिसाद दिला. 2019 मध्ये महापालिकेने प्रतिक्षा बंगल्याला लागून असलेल्या इमारतीची भिंत पाडली. पण अमिताभ यांच्या बंगल्याला काहीही करण्यात आले नाही.
काँग्रेसकडून प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात
दरम्यान काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस नगरसेविकेने मुंबई महापालिकेकडे केली होती. काँग्रेस नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी याबाबत मुंबई पालिकेला पत्र लिहिले होते. सर्वसामान्य लोकांची घर तोडता मग बच्चन यांना वेगळा न्याय का? असा सवाल काँग्रेस नगरसेविकेने केला होता. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरी सर्वेक्षण विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारवाई करता येईल, असे उत्तर पालिकेने दिले होते.
मुंबई महानगरपालिकेने याबाबतची कुठलीच कारवाई का केली नाही? असा सवाल काँग्रेसच्या नगरसेविका ट्युलिप मिरांडा यांनी वॉर्ड ऑफिसला पत्र देऊन उपस्थित केला आहे. नागरी सर्वेक्षण विभागाने प्रतिक्षा बंगल्याचा कोणता आणि किती भाग ताब्यात घ्यायचा आहे हे निश्चित केलं की महापालिका त्वरित कारवाई करुन हा भाग ताब्यात घेईल असे उत्तर वॉर्ड ऑफिसनं दिलं आहे.
येत्या एका महिन्याभरात प्रक्रिया पूर्ण होणार
मुंबई महापालिकेने प्रतिक्षा बंगल्याचा अपेक्षित भाग ताब्यात घेण्यासाठीचा विनंती अर्ज डिसेंबर 2019 मध्ये केला आहे. त्यासाठी आवश्यक ते शुल्कही भरलं आहे. यासाठीची मोजणी फेब्रुवारी 2021 मध्ये झालेली आहे. या भागाच्या भौगोलिक रचनेमुळे काही अडचणी येत आहेत. मात्र या प्रकरणी सर्व माहिती नागरी सर्वेक्षण विभागाच्या कार्यालयाकडे सुपुर्द करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने येत्या एका महिन्याभरात प्रक्रिया पूर्ण होईल, असं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्यावर कारवाई करा, काँग्रेसचे महापालिकेला पत्र
फॅशन नाही तर ‘या’ कारणामुळे अमिताभ बच्चन यांनी बांधली होती शर्टाची गाठ! वाचा ‘दीवार’चा किस्सा…