मुंबई : महापालिका एकीकडे सर्वसामान्यांवर थेट कारवाई करते. मात्र दुसरीकडे अभिनेते बच्चन यांच्यावर मेहरबान असल्याचं दिसून येतंय. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर तूर्तास कारवाई नाही, असं स्पष्टीकरणं लोकायुक्तांच्या सुनावणीत पालिकेनं दिलंय. यावरून हे स्पष्ट होतेय. रस्ता रुंदीकरणासाठी ठेकेदार मिळत नाही. त्यामुळं पालिकेनं प्रतीक्षा बंगल्याच्या भिंतीवर कारवाई न केल्याचं स्पष्टीकरण पालिकेनं लोकायुक्तांसमोर दिलंय.
अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला रस्त्यालगत आहे. रस्ता बांधकाम करताना बंगल्याची भिंत पाडावी लागणार आहे. परंतु, सध्या कंत्राटदार नसल्यानं रस्त्याचं बांधकाम सुरू करण्यात आलं नाही. त्यामुळं सध्यतरी प्रतीक्षावर हातोडा चालणार नाही. सामान्य नागरिकांनी अतिक्रमण केल्यास पालिकेचा हातोडा चालतो. मग, बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यावर का नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.
लोकायुक्त न्यायमूर्ती व्हीएम कानडे यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात, बीएमसीने असे म्हटले आहे की जुहू रस्त्याच्या रुंदीकरणासाठी त्यांच्याकडे रस्ता कंत्राटदार नाही. त्यामुळं सध्या महापालिका बच्चन यांच्या बंगल्याचा आवश्यक भाग ताब्यात घेणार नाही. पुढील आर्थिक वर्षात कंपाउंड वॉल पाडून पुढची कार्यवाही करु असं महापालिकेनं म्हटलंय.
ट्युलिप मिरांडा या काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. मिरांडा यांनी महाराष्ट्र लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार, बीएमसी 2017 पासून रस्ता रुंदीकरणासाठी बच्चन यांच्याकडून जमीन ताब्यात घेण्यात अपयशी ठरली आहे. याबाबत लोकायुक्तांकडं सुनावणी होती. मात्र, या सुनावणीत पालिकेचा अहवाल लोकायुक्तांनी मान्य केला नाही. पुढील सुनावणीत पालिका कारवाई काय करणार याच स्पष्टीकरण मागितलं आहे.