मुंबई : कमाल रशीद खान (Kamaal R. Khan) आणि वाद हे समिकरण काही नवीन नाहीयं. कमाल रशीद खान म्हणजेच केआरके कायमच वादाच्या भोवऱ्यात असतात. 2020 मध्ये केलेल्या एका ट्विट प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) विमानतळावर केआरकेला अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना बोरिवली न्यायालयात (Court) हजर करण्यात आले, तेथून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीयं. काल केआरकेचा जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, त्यावर पुढील महिन्यात 2 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितले की, केआरके बॉलीवूड कलाकारांना टार्गेट करतो आणि त्याच्यांवर वादग्रस्त ट्विट करून समाजातील दोन समुदायांमध्ये वाद निर्माण करतो. आपली बाजू मांडत पोलिसांनी केआरकेची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागितली, जी न्यायालयाने मान्य केली. मात्र, केआरकेच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीला आव्हान दिले आहे.
केआरकेने केलेले ट्विट अक्षय कुमार, राम गोपाल वर्मा, इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याबद्दल होते, परंतु त्यापैकी कोणीही केआरकेविरोधात तक्रार दाखल केलेली नाही. वकिलांचे म्हणणे आहे की, केआरकेविरुद्ध एफआयआर आणखी एका व्यक्तीने दाखल केला आहे. केआरकेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तेव्हा त्याच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने जामीन याचिकेवर सुनावणीसाठी 2 सप्टेंबरला ठेवली आहे.