नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा उलटून गेला. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची जादू अद्यापही प्रेक्षकांवर कायम आहे. नुकताच या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘आटपाट प्रॉडक्शन्स’च्या युट्यूब चॅनेलवर हा प्रोमो पोस्ट करण्यात आला आहे. ‘झुंड’चा पडद्यामागचा प्रवास या व्हिडीओत पहायला मिळतोय. नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. नागपुराच्या गल्लीबोळातील शूटिंगची झलक या मेकिंगच्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहे. नागराज यांच्या या चित्रपटाची शूटिंग कशी पार पडली, बिग बी सेटवर कसे वावरत होते याबद्दल अनेकांना कुतूहल होतं.
जवळपास दीड मिनिटाच्या या व्हिडीओची सुरुवात सेटवरील मुलांच्या धमाल-मस्तीपासून होते. यामध्ये नागराज चित्रपटातील सुरुवातीचा सीन समजावून सांगताना दिसतात. सेटवर बिग बींची एण्ट्री, शूटिंग पाहण्यासाठी लोकांची झालेली गर्दी. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांची भेट, सिनेमॅटोग्राफर, कॅमेरामन यांची कसरत अशा बऱ्याच गोष्टी या व्हिडीओमध्ये पहायला मिळतात.
‘झुंड’ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 12.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 9.3/10 इतकी आयएमडीबी रेटिंग या चित्रपटाला मिळाली आहे. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव तर झालाच, पण त्याचसोबत सोशल मीडियावर दोन गटसुद्धा पडले. आमिर खान, धनुष, जितेंद्र जोशी, रितेश देशमुख, सिद्धार्थ जाधव यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ‘झुंड’चं कौतुक केलं. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.
हेही वाचा:
‘द काश्मीर फाईल्सच्या टीमला शोमध्ये का बोलावलं नाही’ विचारणाऱ्यांना कपिल शर्माचं उत्तर
‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईत लक्षणीय वाढ; दुसऱ्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला