नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाचा प्रिमिअर शो नुकताच अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चित्रपटावरून होणाऱ्या वादावर भाष्य केलं. तसंच विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाबाबतदेखील त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. झुंड हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. तर त्याच्या एका आठवड्याने 11 मार्च रोजी द काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला. या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षक-समीक्षकांवर आपली विशेष छाप सोडली आहे. या दोन्ही चित्रपटांवरून सोशल मीडियावर दोन गट पडले. एका गटाने या चित्रपटांचं समर्थन केलं. तर दुसऱ्या गटाने त्यावर टीका केली. सोशल मीडियावर चित्रपटांवरून होणाऱ्या या वादावरही नागराज मंजुळेंनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले नागराज मंजुळे?
झुंडवरून होणाऱ्या वादावर ते म्हणाले, “प्रत्येकजण मतं मांडू शकतो. पण फिल्म बघून तुम्ही मतं मांडली आणि त्यात तथ्य असेल तर विचार करता येईल. चित्रपट करताना काही ठरवून करता येत नाही. कला ही एक अशी गोष्ट आहे, ज्याचा काही अंदाज आपण बांधू शकतो. पण अगदी तसंच होईल किंवा व्हायला पाहिजे, याचा हट्ट करू शकत नाही. कोण काय बोलतंय, त्याला तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. असे दोन गट पडायची गरज नाही. चित्रपटाची अशी काही गटबाजी नसते. फिल्म येतात आणि आपणच दोन फिल्म्समध्ये भांडण लावतो, याला काही अर्थ नाही. फिल्मला फिल्मसारखं ट्रिट केलं पाहिजे. त्यात वादाचा मुद्दाच नाही.”
नागराज मंजुळे यांची पहिली शॉर्ट फिल्म ‘पिस्तुल्या’ची शूटिंग अहदमनगरमध्ये झाली होती. त्याच्याही आठवणी त्यांनी या मुलाखतीत सांगितल्या. “खूप दिवसांपासून झुंड हा चित्रपट रखडला होता. तो अखेर रिलीज झालाय याचा आनंद आहे. कोविड आणि सुरुवातीला निर्मिती प्रक्रियेत अडथळा आला होता. पिस्तुल्याची शूटिंग अहमदनगरमध्ये केली होती. माझी पहिली शॉर्ट फिल्म मी इथे चित्रीत केली होती आणि आता झुंडच्या निमित्ताने इथे पुन्हा आलो आहे”, असं ते म्हणाले.
हेही वाचा:
The Kashmir Filesची आठवडाभराची कमाई; 100 कोटींच्या क्लबमध्ये होणार सहभागी
‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना Y दर्जाची सुरक्षा