अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) हा बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. अभिनयकौशल्यासोबतच त्याच्या साधेपणाची खूप चर्चा असते. बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटल्यावर पैसा आणि प्रसिद्धी ओघाने आलंच. हे सर्व असूनही नवाजुद्दीन नुकताच मुंबई लोकल ट्रेनमधून (Mumbai local) प्रवास करताना दिसला. एका चाहत्याने मंगळवारी इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये नवाज आधी प्लॅटफॉर्मवर लोकल ट्रेनची वाट पाहताना दिसून येतोय. ट्रेन आल्यानंतर तो आत जाऊन बसतो. मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकू नये आणि वेळेत पोहोचण्यासाठी त्याने लोकल ट्रेनचा पर्याय अवंलबल्याचं सांगितलं. नवाज सध्या त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. मीरा रोड (Mira Road) या ठिकाणी चित्रपटाचं शूटिंग होत असून नवाजला तिथून लगेचच एका कार्यक्रमात पोहोचायचं होतं. अशा वेळी आपली कोणतीही आलिशान गाडी न वापरता नवाजने मुंबई लोकल ट्रेनने प्रवास केला.
या व्हिडीओमध्ये नवाज लाल टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या ट्रॅक पँट्समध्ये पहायला मिळतोय. पांढरा मास्क, गॉगल आणि कॅपने त्याने त्याचा चेहरा पुरेपूर झाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मुंबई लोकल ट्रेनमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकी माझ्यासमोर बसला आहे’, असं कॅप्शन देत एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘तो खरंच हिरा आहे’, असं एकाने म्हटलंय. तर ‘प्रतिभेने परिपूर्ण आणि तितकाच विनम्र’, असं दुसऱ्याने लिहिलंय. याच प्रवासाबद्दल नवाजुद्दीनने एका मुलाखतीत सांगितलं होतं. लोकांनी तुला ओळखलं कसं नाही, असा प्रश्न विचारल्यावर नवाज म्हणाला, “मी सफा आणि मास्क घातला होता. आजकाल मास्कमुळे सर्व काही सोपं झालंय.”
ऑक्टोबर 2020 मध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘सिरीअस मेन’मध्ये नवाजुद्दीन झळकला होता. तो लवकरच हिरोपंती 2 मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. यामध्ये तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
RRR Benchmarks: 100 कोटी क्लबमध्ये RRRची धमाकेदार एण्ट्री; राजामौलींच्या चित्रपटाने रचले नवे विक्रम