अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या दमदार अभिनयकौशल्यासाठी ओळखला जातो. प्रत्येक भूमिका तो अक्षरश: जगतो असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याचा हाच अंदाज चाहत्यांना खूप भावतो. नवाजुद्दीन त्याच्या आगामी ‘हड्डी’ (Haddi) या चित्रपटात एका तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी त्याने केलेला गेटअप सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. नवाजुद्दीनच्या या लूकची तुलना अभिनेत्री अर्चना पुरण सिंगशी करण्यात आली होती. या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्यामागचा संघर्ष उलगडला आहे. हड्डी हा एक रिव्हेंज ड्रामा असून यामध्ये नवाजुद्दीन दुहेरी भूमिका साकारणार आहे. एक महिला आणि एक ट्रान्सजेंडर (transgender) अशा या दोन भूमिका आहेत. दिग्दर्शक अक्षत शर्मा गेल्या चार वर्षांपासून या चित्रपटावर काम करत आहे.
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन म्हणाला, “मी जेव्हा महिलेच्या लूकमध्ये तयार झालो, तेव्हा मला पाहून माझी मुलगी खूप नाराज झाली होती. मी तो लूक भूमिकेसाठी केला होता, हे तिला आता समजलं आहे. त्यामुळे आता ती काही बोलत नाही. या अनुभवानंतर मला हे आवर्जून बोलायचं आहे की, मला त्या सर्व अभिनेत्रींसाठी खूप आदर आहे, जे हे काम रोज करतात. हेअर, मेकअप, कपडे, नखं यांसाठी त्यांना खूप काही करावं लागतं. पूर्ण संसारच घेऊन त्यांना चालावं लागतं. आता मला कळतंय की व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर यायला अभिनेत्रींना अभिनेत्यांपेक्षा जास्त वेळ का लागतो. मेकअप करायला खरंच तेवढा वेळ त्यांना द्यावा लागतो. यापुढे मी आणखी संयमाने वागेन.”
‘हड्डी’मधील भूमिकेसाठी तयार होण्यासाठी नवाजुद्दीनला दररोज तीन तास लागायचे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून पुढच्या वर्षी तो प्रदर्शित होणार आहे. नवाजुद्दीनच्या लूकची तुलना अर्चना पुरण सिंगशी झाल्यानंतर तिनेही एका मुलाखतीत त्यावर प्रतिक्रिया दिली होती. “त्याची आणि माझी हेअरस्टाइल एकसारखीच असल्याने ही तुलना केली जातेय. कपिल शर्मा शोसाठी मी अशी हेअरस्टाइल केली होती”, असं अर्चना म्हणाली.