मुंबई: सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘गोडसे’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर वादाला तोंड फुटले आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महेश मांजरेकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. महेश मांजरेकर आहे तरी कोण? भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचं काय योगदान आहे? केवळ लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी महेश मांजरेकर ही नाटकं करत आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यामुळे आता महेश मांजरेकर यांच्यावतीने आव्हाडांच्या टीकेला कोण प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात ‘गोडसे’ चित्रपटावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे वकील असीम सरोदे यांनीही महेश मांजरेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. महेश मांजरेकरांच्या आगामी ‘गोडसे’ चित्रपटासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. अशा चित्रपटांमुळे महात्मा गांधींच्या प्रतिमेला जराही धक्का लागणार नाही. महेश मांजरेकर कलम 19 ( 2 ) नुसार वाजवी बंधनासह नथुरामाचे उदात्तीकरण न करता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आब राखून ‘गोडसे’ चित्रपटाची निर्मिती करणार असतील तर वकील म्हणून मी त्यांच्यासोबत राहील, असे असीम सरोदे यांनी म्हटले.
Who is Mahesh Manjrekar … wat is his contribution to Indian Cinema….to seek attention such dramas are needed pic.twitter.com/nf2S1l2CAE
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 2, 2021
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी ‘गोडसे’ या चित्रपटाची घोषणा केली होती. मांजरेकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाच्या पोस्टरचा फोटो शेअर केला होता. यावेळी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, वाढदिवसाच्या सर्वात घातक शुभेच्छा! यापूर्वी कोणीही सांगण्याचे धाडस केले नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा!’ संदीप सिंग, राज शांडिल्य आणि महेश मांजरेकर यांनी महात्मा गांधींच्या १५२ व्या जयंतीनिमित्त “गोडसे” सिनेमाची घोषणा केली आहे.
नथुराम गोडसेची कथा नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या स्वरुपाच्या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी खूप धैर्य लागते. माझा नेहमीच कठीण विषयांवर आणि बिनधास्त गोष्टींवर विश्वास आहे. सिनेमाचे हे कथानक अशाच पद्धतीचे आहे. महात्मा गांधींवर गोळीबार करणारी व्यक्ती ही ओळख वगळता त्यांच्याबद्दल कुणालाच जास्त माहिती नाही. त्यांची कथा सिनेमातून सांगताना, कुणालाही पाठिशी घातलेले नाही ना कुणाच्या विरोधात भाष्य केले आहे. योग्य काय अयोग्य काय आहे ते प्रेक्षकांवर आम्ही सोडले आहे, असे महेश मांजरेकर यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली
अभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप, अदखलपात्र गुन्हा दाखल