लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार सोहळा (Oscar 2022) पार पडला. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेता विल स्मिथची (Will Smith) निवेदक क्रिस रॉक (Chris Rock) याच्याशी बाचाबाची झाली. क्रिस रॉकने विलच्या पत्नीवर कमेंट केली. त्यामुळे भडकलेल्या विलने मंचावर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली. जेडाच्या टकलेवरून रॉकने मस्करी केली. पत्नीची केलेली ही मस्करी विस स्मिथला अजिबात आवडली नाही. त्यामुळे तो भर पुरस्कार सोहळ्यात मंचावर गेला आणि क्रिसच्या कानशिलात लगावली. यावरून आता सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही बॉलिवूड कलाकारसुद्धा घडलेल्या या प्रकारावर व्यक्त झाले.
नीतू कपूर यांनी विल स्मिथ आणि क्रिस रॉक यांचा फोटो शेअर करत इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ‘.. आणि ते म्हणतात की महिला त्यांच्या भावनांना कधीच नियंत्रित करू शकत नाही.’ अभिनेता वरुण धवननेही यावर प्रतिक्रिया दिली. ‘वॉव, असं घडेल अशी अपेक्षा केली नव्हती’, असं त्याने लिहिलं. गायिका सोफी चौधरीने म्हटलं, ‘हिंसा हा कधीच पर्याय नसतो, पण एखाद्याच्या मेडिकल कंडिशनवरून मस्करी करणंसुद्धा योग्य नाही. माझ्या सर्वांत आवडत्या कलाकाराच्या करिअरमधील ही सर्वांत महत्त्वाची घडामोड होती. मात्र त्याच्या यशापेक्षा या घटनेची चर्चा अधिक होईल.’
या घटनेच्या काही वेळातच विल स्मिथला त्याच्या किंग रिचर्ड या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. टेनिस खेळाडू सेरेना विलियम्स आणि वीनस विलियम्स यांचे वडील रिचर्ड विलियम्स यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विल भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
ऑस्कर स्वीकारल्यानंतर विल स्मिथचं भाषण
पुरस्कार स्वीकारल्यानंतर विल स्मिथ म्हणाला, “रिचर्ड विलियम्स हे त्यांच्या कुटुंबाचे रक्षक होते. माझ्या आयुष्यातील यावेळी, देवाने मला या जगात काय करण्यासाठी बोलावलं आहे, हे पाहून मी भारावलो आहे. मला अकॅडमीची माफी मागायची आहे, मला माझ्या सर्व सहकारी नामांकित व्यक्तींची माफी मागायची आहे. हा एक सुंदर क्षण आहे आणि मी हा पुरस्कार जिंकल्याबद्दल रडत नाहीये. कला जीवनाचं अनुकरण करतं. मी रिचर्ड विलियम्स यांच्यासारखाच वेड्या वडिलांसारखा आहे. प्रेम तुम्हाला अशा गोष्टी करण्यास भाग पाडतो.” या भाषणाच्या अखेरीस तो म्हणाला, “धन्यवाद. मला आशा आहे की अकॅडमी मला पुन्हा आमंत्रित करेल.”
हेही वाचा:
श्रेयस तळपदे ते मुक्ता बर्वे.. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार
‘अनुपमा’मधल्या प्रसिद्ध अभिनेत्रीने देवाचं कारण देत अभिनयक्षेत्राला केला रामराम!