Nitin Desai : नितीन देसाई यांच्या निधनानंतर 300 तरुणांवर बेरोजगारीचे संकट; सहा गावातील नागरिक चिंतीत

| Updated on: Aug 04, 2023 | 9:06 AM

हातनोली येथील सरपंच रितू ठोंबरे यांनी नितीन देसाई यांच्या निधानावर प्रचंड दु:ख व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षापासून आमचा सर्वांचा नितीन देसाई यांच्याशी संबंध आला आहे.

Nitin Desai : नितीन देसाई यांच्या निधनानंतर 300 तरुणांवर बेरोजगारीचे संकट; सहा गावातील नागरिक चिंतीत
nitin desai
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कर्जत | 4 जुलै 2023 : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओत जीवन संपवलं. नितीन देसाई यांनी अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने सिने जगताला मोठा धक्का बसला आहे. आपल्या कला दिग्दर्शनातून बॉलिवूडमध्ये आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवणारा एक हरहुन्नरी कला दिग्दर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. देसाई यांनी अथक संघर्षातून आणि मोठ्या कष्टाने एनडी स्टुडिओ उभारला होता. या स्टुडिओत त्यांनी कर्जत परिसरातील सहा गावातील तरुणांनाच रोजगार दिला होता. आता देसाई यांच्या निधनामुळे या सुमारे 250 ते 300 तरुणांवर बेरोजगारीचं संकट ओढवलं आहे.

नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. देसाई यांच्या एनडी स्टुडिओत काम करणाऱ्या कामगारांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एनडी स्टुडिओमध्ये काम करणारे अनेक तरुण आसपासपासच्या गावातीलच होते. परंतु स्टुडिओला लागून असलेल्या हातानोली गावातील 80 टक्के लोक या स्टुडिओवर अवलंबून आहेत. एनडी स्टुडिओत काम करणारे हातनोली गावातले 100 हून अधिक लोक या ठिकाणी कामाला होते.

आजूबाजूला पाच-सहा वाड्या असून या वाड्यांमधील 200-300 लोक या ठिकाणी काम करतात. हातोनोलीसह कातकरी वाडी, मोरबे गाव, वावरले, आसरा, जांभिवली इत्यादी भागातील तरुण एनडी स्टुडिओमध्ये काम करत आहेत. नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यामुळे आता या स्टुडिओचे पुढे काय होणार? असाच प्रश्न या तरुणांना पडला आहे. कारण अनेक तरुण एनडी स्टुडिओमध्ये आपली उपजीविका करत होते. आता या सर्वांवर बेरोजगारीचं संकट ओढवलं आहे.

हे सुद्धा वाचा

स्थानिकांना कामावर घ्या

हातनोली येथील सरपंच रितू ठोंबरे यांनी नितीन देसाई यांच्या निधानावर प्रचंड दु:ख व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षापासून आमचा सर्वांचा नितीन देसाई यांच्याशी संबंध आला आहे. माझ्या बाबा आणि काकांपासून ते आम्हाला ओळखतात. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. ते सर्वांना समजून घेत होते. नवनव्या गोष्टी करण्यामध्ये त्यांना प्रचंड आनंद वाटायचा. ते सतत नव्याच्या शोधात असायचे. पण त्यांच्या मनातील दु:ख त्यांनी कधीच बोलून दाखवले नाही. ते कुणाशी याबाबत बोललेही नाही. त्यामुळे नक्की काय झालं हे सांगू शकत नाही. एवढ्या मोठ्या माणसाने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलणं ही गंभीर बाब आहे. याचा तपास झाला पाहिजे, असं रितू ठोंबरे म्हणाल्या.

आमच्या गावातील आणि आसपासच्या गावातील भरपूर लोकं त्यांच्या स्टुडिओत कामाला होते. देसाई यांच्या अचानक निधनामुळे आता या सर्वांवर बेरोजगारीचं संकट निर्माण झालं आहे. हातनोली गावातील लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामाला होते. भविष्यात एनडी स्टुडिओ सुरू केल्यास स्थानिकांना या ठिकाणी कामाला घ्यावं, अशी मागणी ठोंबरे यांनी केली आहे.

घटनेची कल्पनाच नव्हती

दरम्यान, देसाई यांच्या निधनानंतरही एनडी स्टुडिओ पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहे. कालही सकाळीच पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली. पण 15 दिवसांपासून हा स्टुडिओ बंद असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. यातील अनेकांना तर देसाई यांचं निधन झाल्याचं माहीत नव्हतं. आम्हाला घटनेची कल्पना नव्हती. माहीत असतं तर आलो नसतो. या ठिकाणी मुलांना शिकण्यासाठी खूप काही आहे. त्यामुळे हा स्टुडिओ पाहण्यासाठी येत असतो, असं पर्यटक किशोर कालांगडे यांनी सांगितलं. घडलेल्या घटनेवर त्यांनी दु:खही व्यक्त केलं.