मुंबई : वेब सीरीज ‘स्कॅम 1992’द्वारे लोकप्रियता मिळवणारा अभिनेता प्रतीक गांधी (Prateek Gandhi) स्टारर आगामी चित्रपट ‘रावण-लीला’च्या (Ravan Leela) शीर्षकावर गदारोळ झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘भवाई’ (Bhavai) असे केले आहे.
या चित्रपटाच्या शीर्षकावरून झालेल्या वादाबाबत, चित्रपटाचा मुख्य अभिनेता प्रतीक गांधी याने एका मुलाखतीत म्हटले आहे की, या चित्रपटात रावणाचा गौरव दाखवण्यात आलेला नाही. या चित्रपटात राम किंवा रावण या दोघांचीही कथा दाखवण्यात आली नाही. पण प्रेक्षकांना शीर्षकाने आनंद झाला नाहीय, आणि त्यामुळे प्रेक्षकांना प्रसन्न करण्यासाठी शीर्षक बदलण्यात काहीच हरकत नाही, असे मला वाटते.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी एक निवेदन जारी करून ‘रावण लीला’ चे शीर्षक आता ‘भवाई’ झाल्याचे जाहीर केले आहे. प्रेक्षकांची विनंती स्वीकारल्यानंतर आणि त्यांच्या भावनांचा आदर करून हे पाऊल उचलण्यात आले आहे. दिग्दर्शक हार्दिक गज्जर म्हणाले, माझ्या हितचिंतकांच्या आणि प्रेक्षकांच्या शुभेच्छांचा सन्मान करताना मला आनंद होत आहे. भवाई हा गुजराती लोकनाट्य प्रकार म्हणून ओळखला जातो.’
सिनेमा हे एक असे माध्यम आहे, जे लोकांचे मनोरंजन करते आणि आमचा चित्रपट देखील मनोरंजनांनी भरलेला आहे. या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून चित्रपटाला आणि निर्मात्यांना टायटलच्या संदर्भात बऱ्याच ट्रोलिंगचा सामना करावा लागत होता.
‘भवाई’ चित्रपटातील अभिनेता प्रतीक गांधी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो गुजराती चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रतीक गांधीच्या वेब सीरीज ‘स्कॅम 1992’ने त्याला रातोरात स्टार बनवले आणि बॉलिवूड स्टार्सपासून समीक्षकांपर्यंत प्रतिकच्या दमदार अभिनयाचे खूप कौतुक झाले.
‘स्कॅम 1992’ प्रतीक गुजराती व्यावसायिक म्हणून दिसला. या वेळी त्याची शैली या चित्रपटात पूर्णपणे वेगळी असणार आहे, ज्याला त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राईज पॅकेजही म्हणता येईल. आता हे पाहावे लागेल की, प्रतिकच्या जबरदस्त वेब एंट्रीनंतर त्याच्या बॉलिवूड एंट्रीला किती स्तुती मिळू शकते. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हार्दिक गज्जर याचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्याची कथा श्रेयस अनिल लोलेकर यांनी लिहिली आहे. ‘भवई’मध्ये ऐंद्रिता रे, राजेंद्र गुप्ता, राजेश शर्मा आणि अभिमन्यू सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
‘रावण लीला’ची कथा गुजरातमधील खाखर नावाच्या गावात घडते. तसे, गुजरातमध्ये नानी खाखर आणि खाखर मोती नावाची दोन गावे आहेत. पण आत्ता हे सांगणे कठीण आहे की, हा चित्रपट या गावांमध्ये शूट केला गेला आहे की, खाखर नावाचे काल्पनिक गाव तयार केले गेले आहे. बरं, चित्रपटात दिसणारे खाखर हे असे गाव आहे, जिथे आजपर्यंत नाटक-नौटंकी घडलेली नाही. एक दिवस एक टीम त्या गावात रामलीलासाठी येते आणि इथे रामलीलासाठी स्थानिक कलाकारांचा शोध घेत असते. अशा परिस्थितीत त्यांना राजा राम जोशी नावाचा मुलगा भेटतो, ज्याला अभिनय करायचा असतो. पण खूप प्रयत्न आणि ऑडिशननंतर त्याला रावणाची भूमिका मिळते. पण या काळात हा राजा रामलीलामध्ये सीता साकारणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो. पण साहजिकच लोक रिअल आणि रील मधील फरक विसरतात. मुलगा आणि मुलगी भेटण्याऐवजी लोक त्याला रावण आणि सीतेची भेट म्हणून पाहू लागतात.