कोलकाता: प्रसिद्ध गायक केके ऊर्फ कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) यांचा अचानक मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. केके यांचे कोलकात्यामध्ये (Kolkata) एकापाठोपाठ एक असे दोन कार्यक्रम होते. कोलकात्याच्या नजरुल मंच ऑडिटोरियममध्ये परफॉर्मन्स देत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली. गर्दी वाढत जाणं, एसी कमी असणं त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना लगेच हॉटेलमध्ये नेण्यात आलं. मात्र, तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी रस्त्यातचं त्यांचा मृत्यू झाला. केकेचा अचानक मृत्यू झाल्यावर अनेकांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केला आहे. प्रसिद्ध दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची दुसरी पत्नी नंदिता पुरी (nandita puri) यांनी ही केकेंच्या मृत्यूवर प्रश्नचिन्हं उपस्थित करताना प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
नंदिता पुरी या ओम पुरी यांच्या एक्स वाईफ आहेत. त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून काही प्रश्नचिन्हं उपस्थित केले एहाते. मला बंगालची लाज वाटते. कोलकातानेच केकेंना मारलं असून तिथलं सरकार आता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. नजरुल मंचावर पुरेश्या सोयी सुविदान नव्हत्या. या मंचाची क्षमता अडीच हजार लोकांची होती. असं असताना या ऑडिटोरियममध्ये सात हजार लोक कसे आले? त्यामुळे एसी कमी झाला. केकेंनी चारपाच वेळा तक्रार केली. पण त्याची काहीच दखल घेतली गेली नाही. त्या ठिकाणी औषधांची सुविधा नव्हती. औषधोपचाराची किट्स नव्हती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी होईपर्यंत बॉलिवूडने कोलकात्यात परफॉर्म करण्यावर बहिष्कार घातला पाहिजे, असं नंदिता यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
केके यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. त्यानंतर कोलकातामध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवाला सलामीही देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा उपस्थित होत्या. केकेंचं पार्थिव आजच मुंबईत आणलं जात आहे. रात्री पावणे आठ वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव मुंबईत आणलं जाईल. उद्या सकाळी वर्सोवा येथील स्मशानभूमीत केकेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दरम्यान, केके यांच्या निधनामुळे बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान यांनी केकेंच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं आहे. डियर केके…. इतकी काय घाई होती मित्रा…तुझ्या सारख्या गॉड गिफ्टेड गायक आणि कलाकाराने आयुष्याला अधिक सहनशील बनवलं, असं रेहमान यांनी म्हटलं आहे.