11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ला (Laal Singh Chaddha) बॉक्स ऑफिसवर अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. जवळपास चार वर्षांनंतर आमिरचा (Aamir Khan) चित्रपट प्रदर्शित झाला. मिस्टर परफेक्शनिस्टच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रेक्षक-समीक्षकांची निराशा झाली. 2022 च्या फ्लॉप बॉलिवूड चित्रपटांमध्ये लाल सिंग चड्ढाचीही भर पडली. बॉयकॉट ट्रेंडचाही फटका बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. आता दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) यांनी या चित्रपटाच्या अपयशावर प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी हा इशारा असल्याचं त्यांनी म्हटलंय.
‘सिनेस्तान’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “ते ‘बकवास’ चित्रपट बनवतायत ते त्यांना समजलं पाहिजे. चित्रपट फक्त पैसे, कॉर्पोरेट्स आणि अभिनेत्यांना तगडं मानधन देऊन बनत नाहीत. त्यासाठी उत्तम कथा लिहावी लागते, जी प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकेल.”
“लोकांशी संबंधित त्यांनी चित्रपट बनवायला हवेत. हिंदी इंडस्ट्रीतील लोक हिंदीत बोलतात, पण ते चित्रपट कोणते बनवतात? ते रिमेकच्याच गोष्टी चघळत आहेत. तुमच्याकडे सांगण्यासाठी कथा नसेल, तर चित्रपट बनवणं थांबवा. त्यांनी मेहनत घेतली पाहिजे आणि मूळ कथेवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. लोक आता खूप आळशी झाले आहेत”, अशीही टीका त्यांनी केली.
बॉयकॉट ट्रेंडवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आता लोक फक्त संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत आहेत. जर दंगल आणि लगान फ्लॉप झाले असते, तर आपण समजू शकलो असतो की हे बॉयकॉट ट्रेंडमुळे झालंय. पण तुम्ही असा चित्रपट बनवलात, ज्याला अपेक्षित प्रेक्षकच मिळू शकत नाही. मी अजूनही अशा एका व्यक्तीच्या शोधात आहे, जो माझ्याकडे येऊन बोलेल की वाह, काय चित्रपट होता! मला मान्य आहे की आमिरने मेहनत घेतली आणि खूप काम केलं. पण जर तुमच्या कथेत तशी गोष्टच नसेल, तर बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपट चालला नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही”, असं त्यांनी स्पष्ट केलं.