बॉलिवूडमध्ये आजवर अनेकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट, बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचं प्रेरणादायी आयुष्य मोठ्या पडद्यावर मांडण्यात आलं. अशीच एक कथा आता चित्रपटाच्या रुपात प्रदर्शित होणार आहे. ही कथा आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची. सामाजिक विषमता, अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष विषमता, सतीप्रथा यांसारख्या समाजघातक गोष्टींविरोधात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांनी लोकांचा रोष पत्करून काम केलं होतं. अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) आणि अभिनेत्री पत्रलेखा (Patralekhaa) या चित्रपटात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा पोस्टर प्रतीकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘फुले’ असं या चित्रपटाचं नाव आहे. अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. ज्योतिराव फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. (Phule biopic)
“फुले हा माझ्या करिअरमधील पहिला बायोपिक आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व मोठ्या पडद्यावर साकारणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान आहे. हे माझं ड्रीमरोल असून त्याच्या शूटिंगसाठी मी खूप उत्सुक आहे. चित्रपटाची पटकथा ऐकल्यानंतर मी लगेचच होकार कळवला होता. काही भूमिका या तुमच्याकडे सहज येतात आणि या भूमिकेसाठी माझ्याकडे आल्याबद्दल मी अनंत सरांचे आभार मानतो”, असं प्रतीक म्हणाला.
सोनी लिव्हवरील ‘स्कॅम 1992’मध्ये प्रतीक गांधीने दमदार भूमिका साकारली. या वेब सीरिजमधील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तर पत्रलेखाने हंसल मेहता दिग्दर्शित ‘सिटी लाइट्स’ या चित्रपटात भूमिका साकारली. “मी शिलाँग, मेघालय इथं लहानाची मोठी झाली. मातृसत्ताक समाजाचं महत्त्व याठिकाणी खूप आहे आणि त्यामुळे स्त्री-पुरुष समानता हा विषय माझ्या खूप जवळचा आहे. सावित्रीबाईंनी 1848 मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यासाठी धडपड केली होती. महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं. भ्रूणहत्या रोखण्यासाठी त्यांनी अनाथाश्रमाची स्थापना केली. हा एक असा चित्रपट आहे, ज्याचा प्रभाव कायम माझ्या आयुष्यावर राहील,” असं पत्रलेखा म्हणाली.
‘भूतकाळात अनेकांना प्रेरणा देणारी आणि शिक्षित करणारी ही कथा अशा टीमसोबत तयार केली जातेय. मी या चित्रपटाची वाट पाहीन. तुम्हा सर्वांना शुभेच्छा’, अशी प्रतिक्रिया अभिनेता जितेंद्र जोशीने या पोस्टरवर दिली. तर अभिनेता आदिनाथ कोठारेनंही चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
अनंत महादेवन यांनी याआधी ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘गौर हरी दास्तान’ आणि ‘बिटरस्वीट’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. राज किशोर खावरे, प्रणय चोक्शी, सौरभ वर्मा, उत्पल आचार्य, अनुया कुडेचा आणि रितेश कुडेचा निर्मित ‘फुले’ हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
राज ठाकरेंच्या नातवाचा पहिला फोटो, अमित ठाकरेंकडून फोटो पोस्ट
Kitchen Kallakar: ‘किचन कल्लाकार’मध्ये एकनाथ खडसे, किरीट सोमय्यांची धमाल