गेल्या काही दिवसांपासून ऑस्कर पुरस्काराची (Oscar Award) खूप चर्चा आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणा 12 मार्च 2023 रोजी होईल. त्यासाठी चित्रपटांच्या अधिकृत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. भारतातडून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ ऑस्करसाठी पाठवण्यात आला आहे. या शर्यतीत एस एस राजामौलीच्या ‘RRR’ आणि विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांची जोरदार चर्चा होती. इतकंच नव्हे तर आता अभिनेता आर. माधवननेही (R Madhavan) त्याचा ‘रॉकेटरी’ हा चित्रपट ऑस्करला पाठवायला हवा होता, असं म्हटलं आहे.
ऑस्करसाठी ‘रॉकेटरी’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांचाही विचार केला पाहिजे, असं माधवन आणि अभिनेता दर्शन कुमार मस्करीत म्हणाले. “मला वाटतं रॉकेटरी आणि द काश्मीर फाइल्स हेसुद्धा पाठवायला हवेत. तो (दर्शन) काश्मीर फाइल्ससाठी तर मी ‘रॉकेटरी’साठी मोहीम सुरू करत आहे,” असं माधवन हसत म्हणाला. मात्र त्यानंतर त्याने छेल्लो शो या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
“मला आशा आहे की ऑस्करच्या बाबतीत देशात गोष्टी चांगल्या होतील. आता पुरे झालं. आता आपण तिथे काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत”, असं माधवन म्हणाला.
दुसरीकडे ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले की त्यांना या सगळ्या गोष्टींचा त्रास होत नाही. ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाच्या निर्मात्यांना त्यांनी ऑस्करमध्ये जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “मी त्यांचं अभिनंदन करतो. मला अजून काही बोलायचं नाहीये. मला या सर्व गोष्टींची पर्वा नाही.”
सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्रींचा ‘द काश्मीर फाइल्स’ आणि एस एस राजामौलीचा ‘आरआरआर’ चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्याची चर्चा होती. हे दोन्ही चित्रपट देशाने ऑस्करसाठी पाठवावेत, अशी चाहत्यांची इच्छा होती, मात्र ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाने ऑस्करमध्ये प्रवेश केल्याने चाहत्यांना धक्का बसला.