मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव सुपरस्टार म्हटल्या जाणार्या राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी अमृतसर येथे झाला. राजेश खन्ना हे त्या व्यक्तीचे नाव आहे, ज्यांनी संपूर्ण पिढीला चित्रपटातून रोमान्स करायला शिकवले. ‘आराधना’, ‘दो रास्ते’, ‘खामोशी’, ‘सच्चा झूठा’, ‘गुड्डी’, ‘कटी पतंग’, ‘सफर’, ‘दाग’, ‘अमर प्रेम’, ‘प्रेम नगर’ अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट त्यांनी केले आहेत. त्यांनी चित्रपटा व्यतिरिक्त राजकारणातही हात आजमावला.
राजेश खन्ना यांचे सुपरस्टारडम फार काळ टिकले नसेल, पण त्या अल्पावधीत त्यांना जी क्रेझ मिळाली, तशी क्रेझ कदाचित हिंदी चित्रपटांतील कोणत्याही अभिनेत्याला मिळाली नाही. इंडस्ट्रीत राजेश खन्ना यांना लोक ‘काका’ या नावाने हाक मारायचे. त्यांच्या चाहत्या, तरुणी त्यांच्या पांढर्या कारचे गुलाबी लिपस्टिक लावून चुंबन घ्यायच्या आणि त्याच्या पायाची धूळ अर्थात ते जिथून जातील तिथले माती उचलून कपाळी लावायच्या.
राजेश खन्ना यांच्यावर अनेक मुली फिदा होत्या, पण ते मात्र अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यावर प्रेम करत होते. खरे तर अंजू आणि राजेश हे बालपणीचे मित्र होते. दोघेही कॉलेजमध्ये एकत्र शिकले होते. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले होते. मात्र, हळूहळू या नात्याने कटुतेचे रूप धारण केले. राजेश खन्ना अंजूसाठी टिपिकल भारतीय बॉयफ्रेंड बनले. अंजूने मॉडेलिंग करू नये, अशी त्यांची इच्छा होती.
स्टारडस्टला दिलेल्या एका मुलाखतीत अंजू यांनी सांगितले होते की, त्यांचा एक चित्रपट फ्लॉप झाला, त्यामुळे त्यांना धक्काच बसला होता. ते अतिशय मनमिळावू व्यक्ती होते. मात्र, मी सतत त्यांच्या पाया पडावे अशी, त्यांची इच्छा होती. जसे त्यांचे चाहते करत होते. मी त्यांच्यावर प्रेम केले, पण गुलामगिरी स्वीकारू शकले नाही. अंजूशी ब्रेकअपनंतर राजेश यांनी त्यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केले. राजेश खन्ना यांच्या लग्नाची वरात वांद्रेहून जुहूला जात असताना अंजू महेंद्रूच्या लक्षात यावे, म्हणून त्यांनी मुद्दाम मार्ग बदलला, असे देखील म्हटले जाते.
राजेश खन्ना यांनी प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्याशी लग्न केले आणि त्यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात राजेश खन्ना खूप एकटे पडले होते. त्यांना कॅन्सरने ग्रासले होते. 18 जुलै 2012 रोजी या सुपरस्टारने जगाचा निरोप घेतला. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, राजेश खन्ना यांचे मृत्यूसमयी शेवटचे शब्द होते ‘टाईम इज अप, पॅक अप’!
Sunny Leone | कंडोमची जाहिरात ते मधुबन गाणं, सनी लिओनी अन् वादांचं जुनं कनेक्शन!