देशातील प्रसिद्ध विनोदविरांपैकी एक राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचं आज (बुधवार) निधन झालं. 10 ऑगस्ट रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला. तेव्हापासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. राजू श्रीवास्तव यांचं करिअर आणि व्यावसायिक आयुष्य सर्वश्रुत आहे, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीचं नाव शिखा आहे. शिखा आणि राजू यांना अंतरा आणि आयुषमान अशी दोन मुलं आहेत. राजू यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची पत्नी शिखा त्यांच्या पाठीशी उभी राहिली. राजूच्या वाईट काळातही शिखाने त्यांची साथ दिली.
शिखाला पाहताचक्षणी राजू त्यांच्या प्रेमात पडले होते. मात्र त्यांच्याशी लग्न करण्यासाठी राजू यांना 12 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. एका मुलाखतीदरम्यान राजू यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली.
राजू यांनी पहिल्यांदा शिखाला त्यांच्या भावाच्या लग्नात पाहिलं होतं आणि त्याच वेळी ठरवलं होतं की, जर लग्न केलं तर या मुलीसोबतच करेन. पहिल्या भेटीनंतर राजू यांनी शिखा यांचा पत्ता शोधून काढला. जेव्हा त्यांना कळलं की शिखा या त्यांच्या मेहुणीची चुलत बहीण आहे, तेव्हा तिला भेटण्यासाठी इटावाला जाऊ लागले.
त्यावेळी राजू श्रीवास्तव शिखा यांच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करण्याचं धाडस करू शकले नव्हते. त्यादरम्यान त्यांना आपल्या करिअरवरही लक्ष केंद्रीत करायचं होतं. तेव्हाच ते मुंबईकडे निघाले. मुंबईत येऊन त्यांनी खूप संघर्ष केला आणि स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. पण या स्वप्नांच्या दुनियेत त्यांच्या स्वप्नांची राणी मागे राहिली होती. तरीही त्यांनी हार मानली नाही.
राजू यांनी मुंबईहून शिखाला पत्र लिहायला सुरुवात केली. काही काळानंतर घरच्यांना ही बाब समजली आणि त्यांनीसुद्धा लग्नाला होकार दिला. लग्नासाठी त्यांना 12 वर्षे वाट पहावी लागली होती.