नवी दिल्ली: गेल्या 11 दिवसांपासून प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यांच्या प्रकृतीबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे. आजही डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. डॉक्टरांनी राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचंही श्रीवास्तव यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी (doctor) स्पष्ट केलं आहे. श्रीवास्तव यांना न्यूरोकार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असली तरी ब्रेन डेड असल्याच्या वृत्ताचा डॉक्टरांनी इन्कार केला आहे. दरम्यान, राजू श्रीवास्तव हे बरे व्हावेत म्हणून उज्जैन येथील बाबा महाकालच्या (mahakal) गर्भ गृह आणि सिद्धिविनायक मंदिरात पुजाऱ्यांकडून पूजा आणि अभिषेक करण्यात येत आहे. श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देशभरात त्यांच्या चाहत्यांकडून पूजा अर्चा केली जात आहे.
एम्सच्या डॉक्टरांनी आज पुन्हा एकदा राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत अद्याप कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यांची प्रकृती नाजूक आहे. पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे. टीव्ही9 भारतवर्षने याबाबतचं वृत्त दिलं आहे. राजू श्रीवास्तव हे 10 ऑगस्टपासून व्हेंटिलेटरवर आहेत. प्रसिद्ध डॉक्टर नितीश नाईक त्यांच्यावर उपचार करत आहेत.
राजू श्रीवास्तव यांचे सहकारी कलाकार दिनेश दिग्गज यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिरात पूजा केली. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून ही पूजा करण्यात आली आहे. ही संपूर्ण पूजा मंदिरातील पुजाऱ्यांनी केली आहे. याशिवाय येथील सिद्धिविनायक मंदिरातही राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून पूजा करण्यात आली. राजू श्रीवास्तव यांचा फोटो समोर ठेवून मंत्रोच्चारात ही पूजा करण्यात आली. यावेळी राजू श्रीवास्तव यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजू श्रीवास्तव हे सामान्य लोकांशी संबंधित कलाकार आहेत. त्यांनी लोकांना सातत्याने हसवलं. त्यांचं दु:ख दूर केलं. आज त्यांच्यावरच कठिण प्रसंग ओढवला आहे. त्यामुळे त्यांना बरे वाटावे म्हणून आम्ही पूजा करत आहोत. महामृत्यूंजय जपही करण्यात आला आहे. तसेच हा महामृत्यूंजय जप ते बरे होईपर्यंत सुरूच राहील, असं मंदिरातील पुजाऱ्यांनी सांगितलं.