मुंबई: ब्रेन ट्यूमर आणि कर्करोगामुळे राखी सावंत हिची आई जया भेडा यांचा मृत्यू झाला आहे. तब्बल दोन महिने रुग्णालयात मृत्यूशी त्यांनी झुंज दिली. परंतु काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. अखेरच्या दिवसात जया भेडा यांची तब्येत अत्यंत बिघडली होती. त्यांचा व्हिडीओ राखी सावंतने शेअर केला आहे. काळीज पिळवटून टाकणारा हा अंतिम क्षणातील व्हिडीओ आहे.
राखी सावंतची आई जया भेडा यांनी काल रात्री जगाचा निरोप घेतला. आईच्या मृत्यूचा राखीला प्रचंड धक्का बसला आहे. आई गेल्यामुळे राखी एकाकी पडली असून रडून रडून तिची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.
राखी आईच्या अत्यंत जवळची होती. आईच्या सुखदुखात ती सर्वात पुढे असायची. आई आजारी पडली तेव्हा तिने आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. दोन महिने त्या रुग्णालयात अॅडमिट होत्या. आईच्या आजारपणाला पैसा कमी पडू नये म्हणून राखी बिग बॉसच्या शोमध्येही गेली होती. एवढंच काय तिने आईसाठी लग्नही केलं होतं.
राखीने तिची आई जया भेडा यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जया भेडा यांच्या अंतिम क्षणातील हा व्हिडीओ आहे. जया या रुग्णालयात बेडवर पहुडलेल्या आहेत. त्यांना श्वास घेताना त्रास होत असल्याचं या व्हिडीओतून दिसतंय. तर राखी आईच्या बेडजवळ जमिनीवर बसून हमसून हमसून रडताना दिसत आहे.
रडत रडतच आईला बरे वाटावे म्हणून देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे. आईला वाचवण्यासाठी राखीने जंग जंग पछाडले. पाण्यासारखा पैसा ओतला. उत्तमोत्तम उपचार दिले. पण काळाला ते मंजूर नव्हते.
आज माझ्या डोक्यावरून मायेचा हात गेला. आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नाही. आय लव्ह यू आई… आई, तुझ्याशिवाय काहीच नाही. आता माझा आवाज कोण ऐकेल. कोण मला हृदयाला बिलगून धरेल. आता मी काय करू आई? मी कुठे जाऊ?; अशी भावनिक पोस्ट राखीने लिहिली आहे.
राखीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात ती आईचा मृतदेह रुग्णालयातून घरी घेऊन जाताना दिसत आहे. आईचे पार्थिव नेताना ती रडताना दिसत आहे. राखी देहभान विसरून रडताना दिसत आहे.
त्यामुळे तिला सांभाळणं सुद्धा तिच्या नातेवाईकांना कठिण होऊन गेल्याचं दिसत आहे. राखीचं हे रडणं पाहून तिच्या चाहत्यांच्या डोळ्यातही अश्रू तरळल्याशिवाय राहिले नाही. तिचे चाहते तिची सांत्वना करतानाही दिसत आहे.
राखीच्या आईच्या पार्थिवावर अंधेरी पश्चिमेतील महापालिकेच्या ख्रिश्चन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. दुपारी 12 वाजता अंतिम संस्कार होणार आहेत. तशी माहिती राखीच्या इन्स्टाग्रामवरून देण्यात आली आहे.