अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हे बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांमधील गोड मैत्री विविध माध्यमांतून सातत्याने चाहत्यांसमोर येते आणि असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रणवीरने दीपिकाची मातृभाषा कोंकणी (Konkani) शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्याच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. नुकतंच दोघांनी कॅलिफोर्नियातील सॅन जोस इथं एका NRI संमेलनात भाग घेतला होता. या कार्यक्रमाचं आयोजन तिथल्या कोकणी समुदायाने केलं होतं आणि रणवीर-दीपिकाला त्यांनी पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमात रणवीरने कोकणी भाषेत काही ओळी बोलून दाखवल्या. ते ऐकून दीपिकाने त्याचं कौतुक केलं. आपल्या मुलांसाठी कोकणी बोलायला शिकत असल्याचं यावेळी रणवीरने सांगितलं.
रणवीरच्या त्याच्या मुलांसाठी कोकणी भाषा शिकत असल्याचं ऐकताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्याने पुढे भाषा शिकण्यामागचं कारण सांगितलं. “मला कोकणी भाषा समजते पण त्यामागे एक कारण आहे. जेव्हा आम्हाला मुलं होतील, जय झुलेलाल… तेव्हा त्यांच्या आईने त्यांच्याशी कोकणी भाषेक बोलावं आणि ते मला न समजावं अशी माझी इच्छा नाही.” हे ऐकून दीपिकानेही त्याची मस्करी केली. मुलांना मी त्यांच्या वडिलांविरोधात काहीतरी शिकवेन अशी त्याला भीती आहे, असं दीपिका म्हणाली. यावेळी रणवीरची मातृभाषा सिंधी ही आपल्यालाही अस्खलितपणे बोलता येत नाही पण ती भाषा शिकण्याचा मी प्रयत्न करतेय असं दीपिकाने स्पष्ट केलं.
रणवीरचा जयेशभाई जोरदार हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. तो लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातही तो मुख्य भूमिकेत आहे. तर दीपिका ही दिग्दर्शक शकुन बत्राच्या गेहराईयाँ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर ती शाहरुख खानच्या पठाणमध्ये भूमिका साकारणार आहे.