2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’ (Kabhi Khushi Kabhie Gham) या चित्रपटातील बालकलाकार तुम्हाला आठवतोय का? ज्याने चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. तोच बालकलाकार जिब्रान खान (Jibraan Khan) आता जवळपास दोन दशकांनंतर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘इश्क विश्क’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये (Ishq Vishk sequel) तो भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहिद कपूर आणि अमृता रावच्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटाचा सीक्वेल पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटातून जिब्रान पुनरागमन करतोय. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटात त्याने राहुल आणि अंजली यांचा मुलगा क्रिश रायचंदची भूमिका साकारली होती.
चित्रपटात शाहरुख आणि काजोलसोबतच जिब्रानचे फरिदा जलाला, हृतिक रोशन आणि करीना कपूर खान यांच्यासोबतही सीन्स होते. या चित्रपटानंतर त्याने इतरही काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. क्यूँ की मै झूट नही बोलता (2001), रिश्ते (2002) यांमध्येही त्याने भूमिका साकारल्या होत्या. ‘महाभारत’ या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारे फिरोज खान हे जिब्रानचे वडील आहेत.
जिब्रानने नुकतंच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्याच्या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात त्याचा लूक कसा असेल, हेसुद्धा या व्हिडीओत पहायला मिळतंय. ‘स्वप्न सत्यात उतरलं’ असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. या चित्रपटातून राजेश रोशन यांची मुलगी आणि हृतिक रोशनची चुलत बहीण पश्मिना रोशन बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. जिब्रान आणि पश्मिनासोबतच रोहित सराफ आणि नैना गरेवाल यांच्याही भूमिका आहेत. रोहित सराफने डिअर जिंदगी, द स्काय इज पिंक आणि ल्युडो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याची ‘मिसमॅच्ड’ ही सीरिज खूप गाजली. तर नैना गरेवालने थप्पड, बरेली की बर्फी आणि तमाशामध्ये भूमिका साकारल्या आहेत.
बॉलिवूडमधील आणखी एक स्टार किड अभिनयविश्वात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. रोशन कुटुंबातील ही स्टारकिड आहे. राकेश रोशन, राजेश रोशन आणि हृतिक रोशननंतर आता पश्मिना रोशन सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. म्युझिक डायरेक्टर राजेश रोशन यांची ती मुलगी आहे. पुढच्या वर्षी पश्मिनाचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पश्मिनाला लहानपणापासूनच अभिनयात रस आहे, असं तिच्या वडिलांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं.