‘लोक मला ‘कालिया’ म्हणायचे’; रेमो डिसूझाने सांगितला वर्णभेदाचा कटू अनुभव

| Updated on: Mar 01, 2022 | 11:26 AM

रेमो डिसूझा (Remo D'Souza) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक आहे. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय गाणी त्याने कोरिओग्राफ केली आहेत. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

लोक मला कालिया म्हणायचे; रेमो डिसूझाने सांगितला वर्णभेदाचा कटू अनुभव
Remo D'Souza
Image Credit source: Instagram/ Remo D'Souza
Follow us on

रेमो डिसूझा (Remo D’Souza) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक (Bollywood Choreographer) आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोचं परीक्षण करताना रेमो प्रकाशझोतात आला. त्याआधीपासून तो कोरिओग्राफर म्हणून इंडस्ट्रीत प्रसिद्ध होताच. पण या शोमुळे सर्वसामान्यांपर्यंत त्याचा चेहरा पोहोचला. बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय गाणी त्याने कोरिओग्राफ केली आहेत. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रेमोने त्याला आलेला वर्णभेदाचा कटू अनुभव सांगितला आहे. मोहम्मद रफी (Mohammed Rafi) यांच्या ‘हम काले है तो क्या हुआँ दिलवाले है’ या गाण्यावरचा व्हिडीओ त्याने पोस्ट केला आहे. सावळ्या रंगामुळे रेमोला ‘कालिया’, ‘कालू’ असं हिणवत जायचं. मात्र आईने त्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन सांगितल्याचं रेमोने त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय.

काय आहे रेमोची पोस्ट-
‘लोक जेव्हा मला कालिया किंवा कालू म्हणायचे, तेव्हा मला फार राग यायचा. पण माझ्या आईने मला सांगितलं की, रंग नाही तर व्यक्तीचं मन कसं आहे, हे महत्त्वाचं असतं. हे समजावून सांगताना आई मोहम्मद रफी यांचं ‘हम काले है तो क्या हुआँ’ हे गाणं गायची. तेव्हापासून हे माझं आवडतं गाणं आहे. आता मी हे गाणं माझी पत्नी लिझेलसाठी गातो’, असं त्याने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. यासोबतच त्याने बरेच हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

रेमोच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. कोरिओग्राफर आणि रेमोचा खास मित्र टेरेन्स लुईस याने कमेंटमध्ये लिहिलं आहे, ‘भावा, काळा रंग हा फार सुंदर असतो’. तर रेमोची पत्नी लिझेल हिनेसुद्धा कमेंटमध्ये लिहिलं, ‘तू मला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? खरंच’! रेमो हा सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोरिओग्राफर आहे. त्याने ‘रेस 3’, ‘एबीसीडी’ आणि ‘स्ट्रीट डान्सर 3D’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत रेमो म्हणाला होता, “लहानपणापासूनच माझ्या सावळ्या रंगामुळे मी वर्णभेदाचा सामना केला आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशातही मला असा अनुभव आला आहे. मी अशा लोकांकडे फक्त दुर्लक्ष केलं आहे.”

संबंधित बातम्या: नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाने सर्जरीनंतर केला ‘डान्स’ तुफान व्हायरल होतोय तो व्हिडिओ

संबंधित बातम्या: पैशांची फसवणूक, रेमो डिसूझा आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल!

संबंधित बातम्या: चांगली बॉडी आणि फिटनेस असूनही रेमो डिसूझांना हृदय विकाराचा झटका का आला? तज्ज्ञ म्हणतात..