अभिनेता रितेश देशमुख लवकरच ‘पिल’ या वेब सीरिजद्वारे ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ही सीरिज जियो सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. ‘पिल’ ही एक मेडिकल क्राइम सीरिज असून त्यात रितेश हा प्रकाश चौहानची भूमिका साकारणार आहे. सीरिजमध्ये प्रकाश नावाची व्यक्ती ही एका फार्मा कंपनीच्या डेप्युटी मेडिसीन कंट्रोलरपदी कामाला असते. आपल्या रंजक भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवणारा रितेश यामध्ये अत्यंत गंभीर भूमिका साकारताना दिसणार आहे. यानिमित्त ‘टीव्ही 9 हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत रितेश भूमिकांच्या निवडीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.
रितेश देशमुख म्हणाला, “मी सहसा अशा भूमिका साकारणं टाळतो, जिथे मला शिवीगाळ करावी लागेल. एखाद्या भूमिकेची गरज म्हणून त्यात तसे संवाद असले तरीही मी ते करणार नाही. कदाचित पुढे जाऊन मी त्यावर पुन्हा विचार करेन. पण सध्या तरी मी अशा भूमिका साकारणं टाळतो. भविष्यातही अशा उग्र भूमिका पडद्यावर साकारणं मी टाळेन. कोणत्या प्रकारचे चित्रपट करायचे असा प्रश्न असे तर त्यासाठी माझी काही विशेष मापदंडं नाहीत. त्या त्या वेळेनुसार माझे विचार बदलत जातात.”
“मी आतापर्यंत अशा शिवीगाळ करणाऱ्या भूमिका केल्या नाहीत. कारण मला अशा भूमिकांचे ऑफर्सच मिळाले नाहीत, ज्यात शिव्या देणं गरजेचं असेल. मात्र पुढे जाऊन कदाचित माझे विचार बदलू शकतात. सध्या मला असे चित्रपट करायचे आहेत, ज्यांची कथा माझ्या मनाला स्पर्श करू शकेल आणि जी कथा ऐकल्यानंतर मला खूप भारी वाटेल. तेव्हाच मी चित्रपटांना हो म्हणतो. मी गेल्या चार वर्षांपासून कॉमेडी चित्रपटांपासून लांब राहिलो. मात्र हा निर्णय मी काही जाणूनबुजून घेतला नाही. त्याची भरपाई मी पुढच्या वर्षी करणार आहे. हाऊसफुल, धमाल आणि मस्ती या तिन्ही चित्रपटांच्या तयारीला सुरुवात झाली आहे”, असं तो पुढे म्हणाला.
या वेब सीरिजनिमित्त दिलेल्या आणखी एका मुलाखतीत रितेश फिल्म इंडस्ट्रीत कलाकारांचं वाढतं मानधन आणि चित्रपटांचा वाढत असलेला अमाप खर्च याविषयीही व्यक्त झाला. “माझ्या निर्मिती संस्थेत एखादा चित्रपट बनत असेल आणि त्यात माझी भूमिका असेल तर मी मानधन स्वीकारत नाही. मला असं वाटतं की कोणत्याही चित्रपटावर कलाकाराच्या मानधनाचा दबाव असू नये. तरच ते चित्रपट जगू शकतं आणि त्याच्याशी निगडीत इतर सर्व घटक जगू शकतात.”